शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

यशोगाथा थोरांची - मिर्झाराजे जयसिंग

*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🏇🤺🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🤺⚜️


        *मिर्झा राजे जयसिंग*

      *जन्म : 15 जुलै 1611*

      *मृत्यू : 28 आॕगष्ट 1667*

*आग्रा भेटीचे राजकारण मिर्झाराजे: एक कसलेले मुत्सद्दी*
 
           आग-याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, पण त्याचे कारण ठरलेले आधीचे सगळेच प्रसंग पाहिले तर मिर्झाराजांसारख्या मुत्सद्दय़ाला शिवरायांनी किती मुत्सद्दीपणे तोंड दिलं हे लक्षात येतं.

शाहिस्तेखानाच्या पराभवानंतर राजांनी राष्ट्रबांधणी आणि राष्ट्रवृद्धी या दोन्ही आघाडय़ा सांभाळल्या. राष्ट्रवृद्धीसाठी कोकण प्रांतात शिरले. जलमार्ग आपल्या हातात ठेवायचे तर उत्तम जलदुर्ग हवेत म्हणून सिंधुदुर्गासारखा जलकोट बांधायला घेतला. ‘धर्मस्य मूलमर्थ:’ या नात्याने स्वराष्ट्राचे सुराष्ट्रात रूपांतर करायला फार मोठय़ा धनाची आवश्यकता होती. हा पैसा सुरत लुटून प्राप्त केला.

पण शिवाजी महाराजांच्या या उद्योगांमुळे पुन्हा नवे संकट येऊ घातले होते. राजांच्या वाढत्या सामर्थ्यांला संपवायला तशाच तुल्यबळ सरदाराच्या शोधात औरंगजेब होता आणि त्याला तसा सरदार दिसला. राजपूत घराण्यातील कछवाह वंशाचे जयपूर घराणे मोगलांचे पिढीजात एकनिष्ठ चाकर. अकबराने त्याचा सेनापती मानसिंगला ‘मिर्झा’ म्हणजे राजपुत्र हा किताब दिला होता. अशा वंशातील मिर्झाराजे वयाच्या आठव्या वर्षी जहागीरच्या सेवेत रुजू झाले. औरंगजेबाला गादीवर बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. भले भले महावीर शिवाजी महाराजांकडून परास्त झाल्यावर आता औरंगजेबाने मिर्झाराजांची निवड केली. त्यांच्या विनंतीवरून औरंगजेबाने त्यांचे कैदी नगर, परिंडा अशा मोठय़ा किल्लय़ात ठेवण्याची, दख्खनच्या खजिन्यातून हवे तितके पैसे काढायची संमती, असे अधिकार मिर्झाराजांना दिले. चांदी, सोने, हिरे यांनी मढवलेल्या अंबारीसह दोन हत्ती व हिऱ्याचे पदक याशिवाय स्वत:च्या अंगातील कबा व गळ्यातील मोत्याचा कंठा आपल्या हातांनी मिर्झाराजांना दिला. हे सगळे केले तरी मिर्झा आणि शिवाजी दोघे राजपूत असल्याने तेच एकत्र येतील या भीतीने संशयी औरंगजेबाने आपल्या खास मर्जीतील दिलेरखान पठाणालाही मिर्झाराजांसोबत पाठवले. शंकराचे उपासक असलेल्या मिर्झाराजांनी आपल्या यशासाठी धार्मिक आणि तांत्रिक विधी करवून घेतले होते. अशी सगळी तयारी झाल्यावर मिर्झाराजांनी १६६४ च्या अखेरीस दिल्ली सोडली.

कोणकोणत्या परिस्थितीत विजिगीषूने संधी करावा याविषयी विस्तृत विवेचन ‘षाडगुण्यम’ या अधिकरणात आहे. त्यातील सर्वात पहिला नियम ‘परस्माद्धीयमान: संदधीत’। शत्रूपेक्षा दुर्बल असताना संधी करावा. मिर्झाराजांनी राजांच्या प्रातांत सगळीकडे आपले सैन्य पेरून ठेवले. स्वराज्यात जागोजागी त्याची जाळपोळ, लुटालूट सुरू होती. पुरंदरभोवती प्रचंड वेढा पडला होता. राजांचे फार मोठे नुकसान होत होते. राजेही काही स्वस्थ नव्हते. मोगली मुलुखावर छापे टाकणे, त्यांच्या सैन्यावर हल्ले करणे, रसद तोडणे, अशा गोष्टी राजांच्या सैन्याकडूनही सुरू होत्या. शत्रूला जेरीस आणत असतानाच राजे कालापव्यय करत होते. मुघलांना आपल्या पावसाची सवय नसल्याने त्यांचा वेढा सैल पडेल व कोणत्याही मोठय़ा हालचाली होणार नाहीत म्हणून त्यांचे डोळे पावसाळ्याकडे लागले होते.

शिवाय ‘संधिनैकतो विग्रहेणकतश्चेत्करयसिद्धिं पश्येज्ज्यायानपि द्वैधीभूतस्तिष्ठेत’। म्हणजे एका बाजूला संधी व दुसऱ्या बाजूला विग्रह करून कार्यसिद्धी होत असेल तर बलवत्तर राजानेसुद्धा द्वैधिभावाचा अवलंब करावा असे कौटिल्याचे मत आहे. त्यानुसार राजे कधी मिर्झाराजांशी तर कधी दिलेरखानाशी तर कधी आदिलशाहाविरुद्ध मोगलांशी संधी करू पाहात होते.

मिर्झाराजांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव राजांना होती. त्यामुळे त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी मिर्झाराजे महाराष्ट्रात आल्याबरोबर राजांचा दूत मिर्झाराजांना जाऊन भेटला. पुण्यात आल्यावरही राजांनी आपला दूत दोनदा मिर्झाराजांकडे पाठवला. दोघांचेही क्षत्रियत्व, हिंदुत्व, एकाच पातळीवरचे राजेपण अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर मिर्झाराजांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न राजांनी केला. पण त्या कशालाच यश येत नव्हते. औरंगजेबाशी एकनिष्ठ असलेल्या मिर्झाराजांना शिवाजीची संपूर्ण शरणागती हवी होती. मोगलांची आदिलशाही नष्ट करण्याची आस लपलेली नव्हती. त्यामुळे राजांनी मोगलांशी सख्य साधून आदिलशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. त्यालाही मिर्झाराजांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यांनी राजांना स्पष्टपणे बजावले, ‘ताऱ्यांप्रमाणे अगणित फौज तुम्हाला संपवण्यासाठी पाठवली आहे. जीव वाचवायचा असेल तर निमूटपणे शरण येण्यातच तुमची प्रतिष्ठा आहे’. मिर्झाराजांपुढे आपली कोणतीच मात्रा चालत नाही हे राजांच्या लक्षात आले.

आता राजांनी दोन वेगळ्या खेळी खेळल्या. त्यांनी मिर्झाराजांशी संपर्क चालू ठेवला, त्याच वेळी दिलेरखानालाही शरणागतीचे पत्र पाठवले. दिलेरखानाला महाराज अशा प्रकारे मिर्झाराजांशीही संधान बांधू पाहात असतील असा संशय आला व तो संतापला, ‘हे शहाणपण राजांना आधी सुचले असते तर बरे झाले असते,’ अशा आशयाचे पत्र त्याने राजांना पाठवले. थोडक्यात दोन्ही ठिकाणी आपली डाळ शिजणार नाही हे राजांच्या पुरतेपणी लक्षात आले.

आता मात्र त्यांनी रघुनाथपंतांना मिर्झाराजांकडे आपला दूत म्हणून पाठवले. पण ‘बादशाहाने मला बोलणी करण्याचा अधिकार दिला नाही, तरीसुद्धा शिवाजी स्वत: नि:शस्त्र होऊन भेटीस आला तर बादशाहाची कृपा राजांवर व्हावी म्हणून काही प्रयत्न करता येतील,’ असे उत्तर मिर्झाराजांनी रघुनाथपंतांना दिले. आपल्याऐवजी आपल्या पुत्राला भेटीस पाठवून तहाची बोलणी करण्याची इच्छा राजांनी व्यक्त केली. पण ही मागणीसुद्धा धुडकावली गेली. मिर्झाराजांना प्रत्यक्ष शिवाजीच बिनशर्त शरण यायला हवा होता. परिस्थितीत छोटेसेसुद्धा छिद्र पडत नव्हते. स्वराज्याचे प्रचंड नुकसान होत होते.

जेव्हा शक्तिशाली शत्रू मोठय़ा सैन्यानिशी आक्रमण करतो तेव्हा संधी कसा करावा ते कौटिल्याने सांगितले आहे –

प्रवृत्तचक्रेणाक्रान्तो राज्ञा बलवतारबल:।

संधिनोपनमेत्तूर्ण कोशदण्डात्मभूमिभि:।। (७.३.२२)

सैन्याचा उपयोग करून बलवान राजाने आक्रमण केले असता दुर्बल राजाने आपला कोश, सैन्य, स्वत:ला अथवा भूमी देऊ करून त्वरित संधी करून शरण जावे. संधींचे आत्ममिष, पुरुषांतर, अदृष्टपुरुष, परिक्रय, उपग्रह, सुवर्ण, कपाल असे वेगवेगळे प्रकार अर्थशास्त्रात सांगितले आहेत. मिर्झाराजांबरोबर राजांनी ‘आत्ममिष’ संधी केला. यात काही मोजक्या सैन्यानिशी अथवा जितके सैन्य असेल तितक्यानिशी स्वत: विजिगीषूने बलवान राजाच्या सेवेस हजर रहावे लागते. सर्व प्रयत्न थकल्यावर मिर्झाराजांच्या इच्छेनुसार राजे स्वत: त्यांच्या भेटीला गेले.

आता स्वराज्याचे आणखी नुकसान टाळायचे असेल तर घाई करण्याची आवश्यकता राजांना भासू लागली. रघुनाथपंतांनी पुन्हा एकदा मिर्झाराजांची भेट घेतली. ‘राजे आपल्या म्हणण्याप्रमाणे नि:शस्त्र भेटण्यास तयार आहेत. पण बोलणी काहीही झाली तरी राजांच्या जीवितास अपाय होणार नाही,’ याचे वचन मिर्झाराजांकडून हवे होते. बादशाहाच्या वतीने असे वचन देता येत नसेल तरी स्वत: मिर्झाराजांनी तसे वचन दिल्यास राजे भेटीला येतील असा प्रस्ताव ठेवला गेला. भेटीचा दिवस ठरला शके १५८७ आषाढ शुद्ध नवमी ११ जून १६६५.

राजे मिर्झाराजांच्या छावणीजवळ येऊन थांबले. पण अजूनही मिर्झाराजे राजांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. ‘राजे सर्व किल्ले ताब्यात द्यायला तयार असतील तरच राजांनी पुढे यावे अन्यथा तेथूनच परत जावे,’ असा निरोप पाठवला. पण राजांनी मोगलांची चाकरी पत्करली असल्याने त्यांचे अनेक किल्ले मोगलांना देण्याची तयारी दर्शवल्यावर मात्र मिर्झाराजाने आपल्या पथकातले खास राजपूत हत्यारी राजांच्या रक्षणासाठी तैनात केले व त्यांच्या सुरक्षेखाली राजे मिर्झाराजांच्या छावणीत आले.

छावणीत आल्यावर मिर्झाराजांनी राजांना सन्मानाने आपल्या जवळ बसवून घेतले. यात राजांचा सन्मान करणे हा दृश्य हेतू असला तरी राजे बसतील तिथून पुरंदरावर होणारे युद्ध राजांना दिसावे हा सुप्त हेतू होता. कारण अकरा तारखेलाच बालेकिल्ल्यावर निकराची चढाई करण्याचा निर्णय घेतला गेला. राजांच्या नजरेसमोर त्यांच्या लोकांचा नाश करवून संधीत राजांवर मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न होता. संपूर्ण अर्थशास्त्राचा म्हणजेच राजनीतीचा हेतू स्पष्ट करताना कौटिल्य म्हणतो,

प्रजासुखे सुखं राज्ञ: प्रजानां च हिते हितम्।

नात्मप्रियं हितं राज्ञ: प्रजानां तु प्रियं हितम्।।

प्रजेच्या सुखातच राजाचे सुख व प्रजेच्या हितातच राजाचे हित असते. राजाला स्वत:ला जे प्रिय त्यात त्याचे हित नाही, तर प्रजेला जे प्रिय त्यात त्याचे हित आहे.

शिवाजीराजांसाठीसुद्धा त्यांचे लोक, त्यांचे हित हे अधिक महत्त्वाचे होते. आपल्या मावळ्यांचा मृत्यू बघणे राजांना असह्य़ होत होते. म्हणून राजांनी पुरंदर देण्याची तयारी दर्शवली. प्रत्यक्ष जयसिंगाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘शिवाजी येऊन भेटताच त्याने पुरंदर देऊ केला.’ मी उत्तर दिले की, तो गड तर मोगली सेनेने घेतलेलाच आहे. एखाद्या तासात अगर काही मिनिटांत गडकऱ्यांची कत्तल केली जाईल. जर तुला बादशाहाला गड द्यायचाच असेल तर तुझ्याकडे इतर गड पुष्कळ आहेत’. यावर गडावरील लोकांची कत्तल होऊ देऊ नका अशी विनंती राजांनी केली (बा. सी. बेंद्रे, श्री. छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, पृ. ५२६).

यानंतर प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला. हा तह करताना राजे स्वत: गेले असले तरी मनसब मात्र त्यांनी संभाजीसाठी मागितली. मिर्झाराजे औरंगजेबाला शिवाजी महाराजांचे शब्द कळवतात, ‘मी माझ्या मुलाला बादशाहाचा नोकर म्हणून पाठवितो. त्याला पांच हजारी द्यावी. त्याच्या सरंजामार्थ त्याला कोठेही जहागिरी दिली तरी मजला कबूल असेल. तो नेहमी चाकरीवर राहील. माझ्यासाठी म्हणाल तर मला मनसब व चाकरीपासून दूर ठेवा. जेव्हा जेव्हा म्हणून दक्षिणेत युद्धाचे काम येईल तेव्हा तेव्हा ते काम विनाविलंब पार पाडीन’
                            अशा प्रकारे मिर्झाराजांच्या इच्छेनुसार राजांनी ‘आत्ममिष’ संधी करून संपूर्ण शरणागती स्वीकारल्याचा आभास केला व मनसब संभाजीच्या नावे घेऊन त्याचे ‘पुरुषांतर’ संधीत रूपांतर केले. या राजकारणाने राजांनी दोन गोष्टी साधल्या. राष्ट्रासाठी दोन पावलं मागे येऊनसुद्धा स्वत:च्या आत्मसन्मानाला धक्का लागू दिला नाही त्याच वेळी सह्यद्री आणि कोकणासारखा युद्धास उपयुक्त असा स्वत:चा भूप्रदेश सोडून दूर जाता येऊ नये अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मिर्झाराजांसारख्या कसलेल्या राजकारण्याला राजांनी पहिला गुंगारा दिला.
शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून राजगडावर परतले . . . . औरंगजेबाने मिझाराजे जयसिंगाला परत बोलावून घेतले . बुरहानपुरला येताना हातनूरजवळ ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला . 
      मिझाराजे विषप्रयोगाने मृत्यु पावले असा संशय त्यांचा मुलगा कीरतसिंह याला आला . हा विषप्रयोग त्यांचा मुंशी उदयराज याने औरंगजेबाच्या सांगण्यावरुन केला या संशयावरून त्याने उदयराजची सर्व मालमत्ता जप्त करुन त्याला ठार मारण्यासाठी निघाला . पण उदयराज मुन्शी सावध होवून निसटला आणि त्याने बुरहानपुरच्या सुभेदाराच्या घरात आश्रय घेतला. आपल्या वडीलांच्या खुन्याला सोडणार नाही ही भुमिका कीरतसिंगाने घेतली . एक चमत्कार झाला आणि मिझाराजे जयसिंग यांचा मन्शी उदयराज दोन दिवसांनी सभेदाराच्या घरातून बाहेर पडला . उदयराजने मुस्लिम धर्म स्विकारल्यामुळे किरतसिंगाला काही करता आले नाही. मिझाराजांची छत्री बुरहानपुर येथे बांधण्याची औरंगजेबाची आज्ञा झाली . तापी आणि मोहना नदीच्या संगमावर बोहरडा गावाजवळ ही छत्री बांधण्यात आली . उंच चौथऱ्यावर ३६ स्तंभाची ही छत्री वरील घुमटांमुळे दूर वरुनही लक्ष वेधून घेते . तसेच जयपुर जवळील आमेर किल्ल्याच्या पायथ्यालाही राजपरिवारातील छत्र्यामधेही मिझाराजे यांची छत्री आहे. आयुष्यभर मोगलांची प्रामाणिक पणे सेवा करुन त्यांची झालेली मृत्युची कहानी मनाला चटका लावून जाते . म्हणून म्हणतात 'असंगाशी संग प्राणाशी गाठ ' जयपुर , जोधपुर आणि मेवाड एकत्र आले असते तर देशाचा इतिहास आणि भुगोल आज वेगळा असता . अर्थात त्यासाठी युगपुरुष जन्माला यावा लागतो.

        🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

         ♾♾♾ *68* ♾♾♾
           स्त्रोत ~ लोकसत्ता                                                                                                                                                                                                                                                        ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...