शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

भारतरत्न जयप्रकाश नारायण

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                 
  संकलन : श्री अविनाश पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे
                                                                  
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🙋🏻‍♂️⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️🙋🏻‍♂️💥     ​       
     भारतरत्न जयप्रकाश नारायण

          जन्म : 11 ऑक्टोबर 1902
            (सीताबडिअरा , बंगाल   
          प्रेसीडेंसी , ब्रिटीश इंडिया)
         मृत्यू : 8 ऑक्टोबर 1979
                 (वय 76)
        (पटना , बिहार , भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय
इतर नावे : जेपी, लोक नायक
व्यवसाय : कार्यकर्ता, सिद्धांतवादी,  
                राजकारणी
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय    
                      कॉंग्रेस
                      जनता पार्टी
हालचाल : भारत छोडो , सर्वोदय , 
                 जेपी आंदोलन
जोडीदार : प्रभावती देवी
पुरस्कार : रॅमन मॅग्सेसे पुरस्कार  
                     (1965 )
               भारतरत्न (1999) 
                     (मरणोत्तर)
                  जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते. बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे जन्म. तेथेच प्राथमिक व पुढे पाटणा येथे माध्यमिक शालेय शिक्षण. वयाच्या अठराव्या वर्षी प्रभावतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील एक राष्ट्रीय नेते व प्रसिद्ध वकील होते. त्यांनीच चंपारण्यातील अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी गांधीजींना बिहारमध्ये येण्यास पाचारण केले. प्रभावतीदेवींमुळे गांधीजींशी प्रथमपासून त्यांचा निकट संबंध जोडला गेला. इंटरमध्ये असताना त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. १९२२ मध्ये ते अमेरिकेस गेले.विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशास्त्रातील एम्. ए. पदवी त्यांनी घेतली. १९२९ मध्ये ते भारतात परत आले.
           अमेरिकेतच जयप्रकाशांचा मार्क्सवादी विचारांशी परिचय झाला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा ‘आफ्टरमाथ ऑफ द नॉन-को-ऑपरेशन’ हा निबंध व मार्क्स, लेनिन, ट्रॉट्स्की यांचे साहित्य वाचून ते कट्टर मार्क्सवादी बनले. गांधींची विचारप्रणाली व कार्यपद्धती यासंबंधी काही काळ ते असमाधानी होते. तथापि काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीसंबंधीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेशीही ते सहमत नव्हते. मार्क्सवाद्यांनी मध्यमवर्गीयांशी सहकार्य करावे, त्यांनी चालविलेल्या वसाहतींमधील राष्ट्रीय चळवळीतून अंग काढून एकाकी पडू नये, या लेनिनच्याच मताचे ते होते. म्हणून भारतात परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९३० मध्ये जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी जयप्रकाशांना काँग्रेसच्या कामगार विभागाचे प्रमुख नेमले. गांधीजी गोलमेज परिषदेहून परत आल्यानंतर झालेल्या सत्याग्रह-चळचळीच्या दुसऱ्या पर्वात सर्व पुढारी तुरुंगात असताना जयप्रकाशांनी चळचळीची सूत्रे सांभाळली. १९३३ मध्ये मद्रास येथे त्यांना अटक होऊन एक वर्षाची शिक्षा झाली. अन्य समाजवादी तरुणांच्या साहाय्याने आणि सहकार्याने त्यांनी १९३४ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
                   जयप्रकाश या पक्षाचे सरचिटणीस म्हणून नेमले गेले. आपल्या भूमिकेची सांगोपांग चर्चा त्यांनी व्हाय सोशॅलिझम (१९३६) या पुस्तकात केली आहे. भारतीय कम्युनिस्टांनी काँग्रेसला राष्ट्रीय आघाडी म्हणून मान्य केल्यामुळे जयप्रकाशांना समाजवादी कम्युनिस्ट संयुक्त दलाची शक्यता वाटू लागली; म्हणून प्रमुख सहकाऱ्यांचा विरोध असतानाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर त्यांनी समझोता केला. परंतु ही एकता फार काळ टिकली नाही. १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा जयप्रकाशांनी युद्धविरोधाचे व स्वातंत्र्यलढा उग्र करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे १९३९ मध्ये त्यांना अटक होऊन नऊ महिन्यांची शिक्षा झाली. १९४१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करून राजस्थानमधील देवळी तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे राजबंद्यांवरील अन्यायाविरुद्ध ३१ दिवसांचे उपोषण करून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास त्यांनी भाग पाडले.
        १९४२ च्या सुरुवातीस त्यांना बिहारमधील हजारीबाग तुरुंगात हलविण्यात आले. यावेळी बाहेर ‘छोडो भारत’ आंदोलन सुरु झाले होते. त्यात भाग घेण्यासाठी ८ नोव्हेंबरला अत्यंत साहसपूर्ण रीतीने तुरुंगाच्या भिंतींवरून उडी मारून ते फरारी झाले व भूमिगत संघटनेचे नेतृत्व करू लागले. त्यांनी गनिमी तंत्राने लढणारे ‘आझाद दस्ते’ संघटित केले. त्यांच्या नेपाळमधील हालचालींचा सुगावा लागल्याने त्यांना नेपाळी पोलीस ब्रिटिश हद्दीत नेत असताना आझाद दस्त्याच्या सैनिकांनी अचानक हल्ला करून नेपाळी पोलीसांच्या हातून त्यांची सुटका केली. यानंतर जयप्रकाश भारतात परत येऊन भूमिगत राहून कार्य करू लागले. त्यावेळी सरकारने त्यांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. १७ सप्टेंबर १९४३ रोजी अमृतसर रेल्वे स्थानकावर त्यांना पकडण्यात आले व तेथून १९४६ साली त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी टूर्वड‌्‌झ स्ट्रगल (१९४६) हे पुस्तक प्रसिद्ध करून राष्ट्रीय चळवळीची कारणमीमांसा केली.
      ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या वाटाघाटींना, ब्रिटिश सरकारने नेमलेल्या संविधान परिषदेला तसेच देशाच्या फाळणीला जयप्रकाशांचा विरोध होता. अखेर म. गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साध्य होणार नाही; म्हणून त्यांनी १९४८ मध्ये अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना करून काँग्रेसला पर्यायी पक्ष निर्माण केला. पक्षाने नैतिक मूल्यांना सर्वोच्च स्थान द्यावे, साधन शुचितेचे महत्त्व मानावे, सत्ता धारण करणाऱ्या पेक्षा सेवा करणाऱ्यांची प्रतिष्ठाअधिक मानावी, असे आपल्या कार्यकर्त्यांना जयप्रकाशांनी आवाहन केले. त्यांची भूमिका लोकशाही समाजवाद्यांची झाली होती. हिंसेपेक्षा गांधीप्रणीत सत्याग्रह तंत्राचा समाजवाद्यांनी अवलंब करावा, ही त्यांची विचारसरणी पक्षाने स्वीकारली. पक्षाचे पहिले सरचिटणीस म्हणून त्यांचीच निवड झाली.
            जयप्रकाश नारायण त्यांनी कामगार व किसान संघटनेकडे १९४८ ते १९५० च्या दरम्यान विशेष लक्ष दिले. हिंद मजदूर सभा, हिंद किसान पंचायत यासंघटना त्यांच्याच प्रयत्नाने स्थापन झाल्या. अखिल भारतीय रेल्वे कामगार संघ, अखिल भारतीय टपाल व तार खाते संघ, अखिल भारतीय संरक्षण कामगार संघ यांचेही ते अध्यक्ष होते. १९५२ मध्ये त्यांनी आचार्य कृपलानी यांचा कृषक मजदूर प्रजा पक्ष व समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण घडवून आणण्यात पुढाकार घेतला. या विलीनीकरणातून अस्तित्वात आलेल्या प्रजासमाजवादी पक्षाचे तेच पहिलेसरचिटणीस झाले. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षाचा पराभव झाला. त्याच सुमारास टपाल व तार खात्यातील कामगार संपाच्या बाबतीत संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनांवर भिस्त ठेवून त्यांनी संप मागे घेतला.आश्वासन मात्र पुरे करण्यात न आल्यामुळे अस्वस्थ होऊन जयप्रकाशांनी पुण्यात आत्मशुद्धीसाठी तीन आठवड्यांचे उपोषण केले. या वेळी केलेल्या विचारमंथनातून त्यांची नवी वैचारिक भूमिका तयार झाली. तत्त्वप्रणाली म्हणून त्यांनी आता जाहीर रीत्या मार्क्सवादाचा त्यागकेला.
                 मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादात माणसाने सदाचारी का असावे, याला उत्तर मिळत नाही, असे मत झाले. भौतिक गरजांची परिसीमा आणि समाजवाद, पक्षीय राजनीती, सत्तेचे विकेंद्रीकरण, मानव समाजामध्ये राज्यसत्तेचे स्थान, जनतेचा समाजवाद विरुद्ध शासकीय समाजवाद, भावी समाजवादाचे रूप इ. प्रश्नांबाबत त्यांनी बराच ऊहापोह केला. १९५३ मध्ये नेहरूंनी जयप्रकाशांना वाटाघाटीस बोलाविले; जयप्रकाशांनी आपला पक्ष बरखास्त न करता मंत्रिमंडळात येऊन सहकार्य करावे, अशी नेहरूंची सूचना होती;परंतु किमान कार्यक्रमावर एकमत झाल्याशिवाय अशा प्रकारचे सहकार्य अशक्य आहे, अशी जयप्रकाश यांनी भूमिका घेतली. ती नेहरूंनामान्य न झाल्यामुळे वाटाघाटी अयशस्वी झाल्या. त्या वर्षी रंगून येथे झालेल्या आशियाई समाजवादी परिषदेत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले. आशियाई क्रांती ही किसान क्रांती असली पाहिजे; व ही लोकक्रांती अहिंसक मार्गाने करणे इष्ट आहे, असे विचारत्यांनी परिषदेपुढे मांडले.
                      त्यांनी १९५३ नंतर विनोबाजींच्या भूदान आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली. १९ एप्रिल १९५४ मध्ये बोधगया येथील सर्वोदय संमेलनात भूदान कार्यासाठी पक्षीय राजकारणातून त्यांनी संपूर्णतया अंग काढून घेतले. त्यांनी ए प्ली फॉर द रिकंस्ट्रक्शन ऑफ इंडियन पॉलिटी व फ्रॉम सोशॅलिझम टू सर्वोदय (१९५९) ही पुस्तके लिहिली.१९६१ च्या सर्वोदय संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना आपल्या राजकारण-संन्यासाच्या मर्यादाही त्यांनी स्पष्ट केल्या होत्या; पक्षीय राजकारणाचा त्याग म्हणजे देशातील घडामोडींसंबंधी उदासीन राहणे नव्हे; उलट राष्ट्रीय जीवनात अधिक परिणामकारक व अधिक रचनात्मक भाग घेण्यासाठी पक्षीय व सत्तात्मक राजकारणातूनआपण दूर झालो आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. १९५४ ते १९७२ पर्यंत जयप्रकाश भूदान आंदेलनातच मग्न होते. परंतु या काळातही त्यांनी काही महत्त्वाची राजकीय कामे केली. १९६० मध्ये नवी दिल्ली येथे त्यांनी तिबेटच्या प्रश्नांवर आफ्रो-आशियाई परिषद भरविली; १९६२ मध्ये पाकिस्तानबरोबर पुन्हा स्नेहसंबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘पाकिस्तान रिकन्सिलिएशन ग्रुप’ स्थापन केला; नागालँडमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या शांतता मंडळाचे ते सदस्य होते.
              जयप्रकाशांच्या प्रयत्नाने १९६४ मध्ये भारत सरकार व नागा बंडखोर पुढारी यांत युद्धविराम तहावर सह्या झाल्या. १९६५ मध्ये त्यांना शांतता कार्याबद्दल रेमन मागसाय हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७० मध्ये त्यांनी बिहारच्या मुझफरपूर जिल्ह्यात दौरा काढून तेथील नक्षलवाद्यांचे हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. १९७१ मध्ये त्यांनी बांगलादेशामधील परिस्थिती जगापुढे मांडण्यासाठी जागतिक दौरा केला आणि त्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविली; मे १९७२ मध्ये मध्यप्रदेशातील २६७ अट्टल दरोडेखोरांनी जयप्रकाशांच्या विनंतीवरून भारत सरकार व मध्य प्रदेश सरकार यांच्या पुढे शरणागती पत्करली.
         जयप्रकाशांनी संशोधन कार्य करणाऱ्या संस्थाही या काळात स्थापन केल्या. ‘असोशिएशन ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज फॉर रूरल डेव्हलपमेंट’, ‘गांधीयन इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज’आणि‘अखिल भारतीय पंचायत परिषद’ या संस्थांचे ते अध्यक्ष किंवा मानसेवी संचालक होते. तसेच ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या वैचारिक व सांस्कृतिकस्वातंत्र्यास वाहिलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते एक संस्थापक व अनेक वर्षे मानसेवी अध्यक्ष होते.  ‘इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे सुरुवातीपासून ते सदस्य आहेत.
               प्रभावतीदेवी १५ एप्रिल १९७३ मध्ये निधन पावल्यानंतर जयप्रकाश यांची प्रकृती अधिकच खालावत गेली; त्यांना मधुमेहाचा व रक्तदाबाचा विकार जडला.
                    १९७० पासून भूदान आंदोलनाबद्दल त्यांना असमाधान वाटू लागले. भूदान आंदोलनात केवळ अनुनयावर भर आहे, पण त्यांतून फलनिष्पत्ती होत नाही, असे अनुभवासआल्यामुळे अनुनय अयशस्वी ठरला, तर गांधीप्रणीत अहिंसात्मक असहकार अथवा प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी भूमिका ते घेऊ लागले. या प्रश्नावर आचार्यविनोबांशी त्यांचे मतभेद झाले. देशातील सर्वंकष भ्रष्टाचार, दुबळ्या घटकांच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष इ. प्रश्नांनी अस्वस्थ होऊन त्यांनी देशाला सर्वंकष क्रांतीची गरजआहे ही भूमिका घेतली व त्यानुरूप गुजरात राज्यातील राजकीय सत्तांतर व बिहारमधील आंदोलन यांचा पुरस्कार केला. २५ जून १९७५ पासून देशात आणीबाणी जाहीरझाली व त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आले. पुढे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. जयप्रकाश मार्क्सवाद, लोकशाही, समाजवाद या मार्गांनीसर्वोदयाकडे वळले होते. परंतु या सर्व विचारपरिवर्तनात त्यांचा क्रांतीवरील विश्वास ढळलेला नाही.
                          
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

         ♾♾♾  ♾♾♾
          स्त्रोत - Wikipedia                          ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...