शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

पांगुळगाडा - लेखक श्री वासुदेव पाटील (संग्राहक : श्री अविनाश पाटील)

पांगुळगाडा

          🔖 भाग::-- तिसरा

     ✒️  वा......पा.............
   गिरधन आबाची नात गेल्यानं श्रीराम पेंटरनं मंदीर रंगवण्याचं काम पाच दिवस बंद ठेवत दुसऱ्या गावाची कामं उरकली‌. गयभू, लिला, आबा  तर सुन्न होतेच पण सोबत दोन्ही मोरबीतलं वातावरणही सुन्न. जो तो आपापल्या लहान मुलांना जपू लागला. डोळ्यात तेल घालत मुलांच्या पाळतीवर राहू लागला. रात्री केव्हाही उठत मुलं जागेवर आहेत याची खात्री करु लागला. जरा कुठं  खुट्ट झालं की काळजात धस्स होऊ लागलं. आता पर्यंत जी तापी माय मायेच्या मायेनं पालनपोषण करत आली त्याच तापी मायकडं जो तो साशंकतेनं पाहू लागला. काठाकडं जायला घाबरू लागला. गावातली तरणीबांड पोरं रात्रीची गस्त सुरू करण्याची प्लॅनिंग करु लागले.

    पाचव्या दिवशी वायकरांनी श्रीराम पेंटरला पोलीस स्टेशनला बोलवलं. त्यांना माहीत होतं की आपण जे करतोय त्याला कायद्याचा आधार नाही. तरी तूर्तास दुसरा मार्गच सापडत नव्हता.

" श्रीराम! आज रात्री पासून मंदीर रंगवायचं काम सुरू कर!"

" साहेब मंदीराचे अध्यक्ष - गिरधर आबाकडं दु:खाचा प्रसंग गुदरला म्हणून ते काम बंद ठेवलय!"

" आबांनी स्वत: काम बंद करायला सांगितलं का?"

" आबा तसं बोलले नाही पण ..."

" मग उद्याच कामाला सुरूवात कर! पण त्या आधी दिवसा आमच्या पोलीस स्टेशनची रंगरंगोटी कर नी रात्री मंदीराचं काम कर"

ततफफ करत श्रीरामनं होकार दिला व परतत कामास सुरुवात केली. त्यानं दिवसभर पोलीस स्टेशनात पेंटीग केली. कदमनं साहेबांनी सांगितल्याप्रमाणं लक्ष घालत दिवसभर त्याला अजिबात विश्रांती घेऊ दिली नाही. रात्री जेवणानंतर लगेच कदमांनी त्याला मंदीराच्या कामावर पाठवलं. श्रीराम पेंटर वाल कंपाऊड ची मधली बाजू चितारू लागला. कुठं विठ्ठलाची, शंकराची आरती लिही, कुठं शिवमहिमा चितार,  कुठं  संताची चित्रे काढ, नामा, तुकोबाराय, माऊली चितार, असं करत करत रात्रीच्या दोन पावेतो तो मोरबीकडच्या गेटपर्यंत आला. वायकरांनी कदमांना मंदीरातच आजूबाजूला दूर थांबायला लावत  त्याला झोपू न द्यायला लावलं होतं. दोनच्या सुमारास पेट्रोलींग करत वायकर ही मंदीरात आले. श्रीराम पेंटरच्या डोळ्यात आता गुंगी येऊ लागली. त्यानं गेटजवळची मधली बाजूच चितारायला घेतली. बिलकुल विरुद्ध बाजूस बाहेर मधलं दृश्य चितारलं होतं. आता मधल्या बाजूस बाहेरचं दिसणारं दृश्य चितारण्याचं त्यानं ठरवलं. समोर लहान मोरबीकडून उतरणारी उतरण तो उतारू ( चितारू)  लागला. वायकर व कदम विठ्ठल मंदीराच्या सभामंडपातल्या खिडकीतून त्याकडं पाहत होते. चितारता चितारता पेंटर नं जांभई देत ब्रश खाली ठेवला. थोडं मागे सरकत ताणलेल्या व शिणलेल्या अंगाला आळोखे पिळोखे दिले. तरी डोळ्यात आता झोप उतरत झापडं जडावली. तो ब्रश घेत वरची दिसणारी घरं, दबलेली व मागंपुढं सरकलेली धाबी, मावठी, पक्क्या हवेलीच्या तिरकस भिंती, मनोरे चितारु लागला. आता झोप पूर्ण घेरू लागली. एक झपकी घ्यावी म्हणून तो ब्रश ठेवणार तोच खाडकन पुन्हा डोळे उघडत त्याचे हात आपोआप सरावानं सपासप चालू लागले. झोप, जाग, संवेदन, जाणिव की नेणीव... आपण झोपतोय.... आपण चितारतोय ! काय नेमकं काय? रंगात ब्रश की  मनाच्या नेणीवेत जाग? की जाणिवेत झोप? ब्रशचे फर्ऱ्हाटे सुरुच, डुलकी सुरुच. तो तसाच जागेवर कलला.

    वायकर मंदीरातून हळूच पुढे आले. त्यांनी लहान मोरबीच्या उताराच्या वाटेवर केव्हाची रोखून धरलेली नजर चित्रावर रोखली! त्यांचा अंदाज खरा ठरला होता. तरी ते अचंबीत झाले. चित्रात गेटमधून दिसणारं मोरबीचं दृश्य चपखल चितारलं असलं तरी उतारावरुन  पांगुळगाडा ढकलत उतरणारी गिरधर आबाची नात बाली  कशी? बालीला जाऊन सहा दिवस झालेले. श्रीराम चित्र काढत होता तेव्हा वायकरची नजर उतारावरच होती. तेव्हा त्यांना उतारावर ना पांगुळगाडा दिसला ना बाली! मग श्रीरामनं त्या दिवसा सारखाच आजही पांगुळगाडा का चितारला!वायकरनं कदमकडं पाहिलं. कदम तर विस्फारल्या डोळ्यांनी  पाहतच होता.
       वायकरनं श्रीरामला हलवत उठवलं.

" श्रीराम! सुंदर चित्र रेखाटलं तू! "

श्रीरामची नजर चित्रावर स्थिरावली. तो चमकला.

" साहेब! आजही तशीच चूक झाली झोपेत."

तो ब्रश रंगात बुडवत बाली व पांगुळगाड्यावर मारू लागला.

" थांब श्रीराम! आधी हा झोल नेमका काय? त्या दिवशी ही झोपेत तू पांगुळगाडाच चितारला अन आजही पांगुळगाडाच! सोबत आबांची पाच - सहा दिवसांपूर्वी मेलेली नात? जागतेपणी चितारता येणार नाही ते तू झोपेत कसं चितारु शकतो! श्रीराम सत्य काय ते सांग नाही तर पट्ट्या- लाथेनं बुकलत अंदर टाकतो! दोन निष्पाप मुलांचा जीव गेलाय!"

" साहेब! झोपेत चित्रे चितारले गेलेत हे आपणास खोटं वाटत असलं तरी ते‌च सत्य आहे! भले आपण मला तुडवलं, फासावर लटकवलं तरी तेच सत्य आहे!"

 " श्रीराम! यात काही तरी पाणी मुरतंय ! पटकन सांगून मोकळा हो!"

श्रीरामनं तोच नन्नाचा  पाढा लावला.

" कदम याला झोपूच नको देऊ! झोपला तरी चित्र काढणं सुरुच ठेवा!"

   सकाळी वायकर एकदम संभ्रमात पडले. पेंटर झोपल्यावर चित्र काढूच कसा शकतो? तेही तोच पांगुळगाडा, तीच मुलगी? पांगुळगाड्याचा काय संबंध!"

  श्रीराम पेंटर दिवसा पोलीस स्टेशन रंगवू लागला. दुपारी जेमतेम एक दोन तास त्याला झोपू दिलं.
    
    वायकरांना पांगुळगाडा डोळ्याभोवती गरगर फिरु लागला. त्यांनी शेवटी बारकू बोरसास स्टेशनात आणलंच. संशयीत म्हणून एकदा तपासायला काय हरकत आहे ? असा विचार करत त्यांनी बारकूस घेतलं. श्रीराम पेंटरनं पेंटींग करतांना  बारकू बोरसास आत येतांना पाहिलं. त्यांच्या अर्धवट झोपेनं बहिरट झालेल्या मेंदूत हे कुठं तरी कोरलं गेलं.

तिशी पस्तीशीतला बारकू बोरसे अंगानं भरलेला गोरापान व कामानं शरीर पिळदार बनवलेला गडी! तरी ठाण्यावर येताच आतून पुरता घाबरलेला.

   " बोरसे! गाव कोणतं तुझं?"

" पांघण! देवाचं पांघण साहेब! इथून चाळीस किमी अंतरावर तापीकाठावरच वसलंय!"

" गाव सोडून मोरबीत कसा आलास?"

" गावात धंदा म्हणावा तसा चालत नव्हता साहेब! मग नवीन गाव शोधता शोधता याच गावात आलो!"

"  धंदाच करतो की इतर धंदे ही करतो?"

" साहेब!.... म्हणजे...?"

" उलट सवाल नको! जे विचारलं ते सांग मुकाट्यानं!"

" नाही साहेब. फक्त लाकुडकाम!" बारकू खाली मान घालत बोलला.

" गावात काय घडतंय माहीत आहे का तुला!"

"........"

" बोरसे, मी काय विचारतोय?"

" हो साहेब! तात्यांचा नातू गायब झालाय तर आबांची नात....."

" दोघा मुलांच्या घटनेस्थळी पांगुळगाडा सापडलाय!  कदम! आणा ते दोन्ही पांगुळगाडे!"  वायकरनं जोरात कदमला आरोळी ठोकली.

 कदमनं दोन्ही पांगुळगाडे आणले. श्रीराम पेंटर ब्रश चालवत तिरकी नजर मध्ये टाकत होता. बोरसा समोर पांगुळगाडे पडलेत. ही जाणीव ही त्याच्या मेदूत कोरली.

" बोरसे! तूच बनवलेत ना हे?”

" हो साहेब!"

" किती पांगुळगाडे बनवलेत तू? कुणाकुणाकडे दिलेत तू?"

" साहेब! या गावात एवढे नाही. तीन बनवलेत!"

" तुझ्या गावाला ही बनवत आला असशील तू? तिथं ही काही घटना?"

" बनवलेत साहेब!"

" काही विचीत्र अनुभव, घटना?"

" नाही साहेब"

" इथं तिसरा पांगुळगाडा कुणाकडं दिलाय? केव्हा?"

" गयभू घेऊन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशीच नानजी पाटलाकडं"

वायकर चपापले.

" नानजी पाटील मोठ्या मोरबीतले का?”

" होय साहेब!"

नंतर वायकरने त्यास 'बोलवलं की सरळ ठाण्यात यायचं' सांगत  जाऊ दिलं.

" कदम ! आपला तपास हा वाऱ्यावरच्या लाथा तर नाहीत ना?
वायकरनं कदमालाच विचारलं. पण कदमच्या मनातही तेच विचार घोळत होते. हा  पेंटर भंगोड्या असावा. याच्या नादी लागून साहेब तपासाची दिशा भरकटत नेत आहेत व वेळ ही वाया घालवत आहेत.

     वायकरनं नानजी पाटलाकडं जात घरात लहान मूलं किती याबाबत‌ चौकशी करत मुलांच्या काळजी घेण्यांचा सुचक सल्लाही दिला.

 रात्री श्रीराम पेंटर ला पुन्हा मंदीराचं राहिलेलं काम करण्यासाठी पाठवलं. आता रात्री तो मंदीराची पुर्वेकडील भिंत आतून  चितारणार होता. मंदीराच्या समोरील या भागात पटांगण होतं. या भिंतीला तापीकाठाकडं जाण्यासाठी  महादेव मंदीराच्या समोर तिरकस गेट होतं. त्याच गेटमधून तात्यांचा नातू बाहेर पडला असावा. 
  पेंटरनं त्या भिंतीवर मधल्या बाजूस संत व त्यांचा जिवनपट चितारावयास सुरुवात केली. संतसेना, माती तुडवणारे गोरोबा, मळ्यात राबणारे सावता माळी ,संत नरहरी सोनार असे एक एक संत चितारता चितारत पहाटे तीन वाजायला तो काठाकडं जाणाऱ्या गेटजवळ आला. तेथे तो समोर दिसणारा तापीकाठ , संथ तापीमाय काढणार होता. पण विविध समाजाचे संत चितारता चितारता झोपेच्या गुंगीत समाज, समाजातील विविध व्यवसाय ही कल्पना त्याच्या सुप्त मनात साकारली जाऊ लागली. गोरोबा साकारतांना त्याला आपल्या मोरबीतला कुंभार आठवला, सावता माळी काढतांना गावातले भाजीपाला पिकवणारे माळी आठवू लागले. मग तंद्रीत गावातले सर्व व्यावसायिक आठवत राहिले. झोप दाटू लागली. गुंगी चढू लागली. गेटजवळ तापीकाठ, सौंदळची झाडं ...समोर दिसणारं  जे तो कायम पाहत आलेला होता ते चित्रात उतरु लागलं. पुन्हा झोप, जाग, जाणिवा- नेणिवा, मनाचे खेळ, मनातल्या प्रांतात चालणारे व्यवहार ....सारं सारं खुलं होऊ लागलं. तो चित्र चितारता चितारताच कलला. 

मंदिराच्या संभामंडपात बसून बसून डुलकी देणारे वायकर खडबडून उठले. ते चित्राजवळ आले. आता तर ते जागेवर हबकून अक्षरश: उडालेच.
गेटजवळचं मधल्या भागातून समोर दिसणारं दृश्य श्रीरामनं चितारलं होतं.
 मंदीरापासून पसरलेला तापीकाठ....खोरं...सौंदळची झाडं...एका सौंदळच्या झाडाजवळ पांगुळगाडा ठेवत काठाकडं हात वर करत- जणू कुणाचा तरी हात धरत दुडूदुडू चालत असल्यासारखा मुलगा! पण सोबत दोन्ही बाजूला कोण  चालतंय हे दिसत नव्हतं. मोरबीच्या गेटकडच्या दिशेनं असाच एक पांगुळगाडा मुलगी तापीपात्राकडं ढकलत नेत होती. तसाच तिसरा पांगुळगाडा मोठ्या मोरबीकडून येतांना दिसत होता पण त्याच्याजवळ मूल दिसत नव्हतं. आणि.....आणि....तापी पात्राजवळ बोरसाचं वासलं, किकरं, कुऱ्हाड, रंधा, करवत, लाकडं पडलेली. बोरसा खाली मान घालत किंचीत वर डोळे करत  मुलांकडं पाहत पांगुळगाडा बनवत होता. अप्रतिम, जिवंत चित्र साकारलेलं. वायकर पाहून थक्क झाले.

 " साहेब हा पेंटर भांग खाऊन काम करतो वाटतं. दिवसा जे पाहतो तेच नशेत चितारतो! याच्या नादी आपला तपास भरकटतोय! " कदम वायकर साहेबास सुचवत होता

 तोवर मोरबीतून पहाटे लोक यायला लागले. चार दोन लोकांनी चित्र पाहिलं.  वायकरनं श्रीरामला उठवलं.श्रीरामला खूण करताच श्रीरामनं ब्रश रंगात बुडवत सपासप चित्रावर फिरवत मिटवलं व तो पुन्हा तापीकाठ रंगवू लागला. पण आता समोर जे दिसायचं तेच साकारू लागलं.

   वायकरनं सकाळी नऊ वाजताच बारकू बोरसाच्या पेकाटात बुटासहीत लाथ घालत गाडीत बसवत ठाण्यात आणलं. ठाण्यात येताच पुन्हा दोन तीन लाथा घातल्या. बोरकू बोरसाच्या ओठात दात घुसत रक्त वाहत होतं. ते पुसत तो गयावया करत होता.

"बारकू शेठ! जरा ही रंधा इकडं तिकडं न चालवता गुण्यात लाकुड तासत धारकोर तासतो तसंचं सरळ सरळ सारं खरं खरं ओक!" वायकर लालेलाल होत फुत्कारत होते.

" साहेब! सारं सारं सांगतो! पण विश्वास ठेवा मी मुलांना काहीही केलं नाही! "

.
.
.
 क्रमश:......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...