बुधवार, २३ मार्च, २०२२

२३ मार्च शहीद दिन

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
              ▬ ❚❂❚❂❚ ▬              संकलन - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                          
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   💥⛓🔫🇮🇳🙅‍♂🇮🇳🔫⛓💥

        23 मार्च शहीद दिन 


       शहिदे आझम भगतसिंग

     जन्म :  28 सप्टेंबर 1907
      (ल्यालपूर, पंजाब, भारत)
      फाशी : 23 मार्च 1931
(लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत)

टोपणनाव : भागनवाला
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: नौजवान भारत सभा,
            कीर्ती किसान पार्टी,
            हिंदुस्तान सोशालिस्ट     
            रिपब्लिकन असोसिएशन
पत्रकारिता/ लेखन: अकाली, 
              अनुवाद, 'मेरा आयरिश     
               स्वतंत्रता संग्राम'
धर्म: नास्तिक
प्रभाव: समाजवाद, कम्युनिस्ट
प्रभावित: चंद्रशेखर आझाद
वडील: सरदार किशनसिंग संधू
आई: विद्यावती

            भगतसिंग  एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि गीते मधला श्लोक उचलून हसत हसत फासावर चढले.
                  डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि त्यांचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर, ब्रिटिश भारत येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे ते दोन आठवड्यांनंतर मरण पावले. 
                  त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकाऱ्याला मारले.

भगतसिंग यांचे सुरुवातीचे जीवन-
            भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्यांचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. त्यांचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.
           त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखा तो लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेला नाही. त्याच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. 
                बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर त्यांचा अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाला, व ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचा समर्थक झाला.
        ईटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या 'यंग ईटाली' नावाच्या गटापासुन प्रेरीत होऊन भगतसिंगने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापित केली. तो हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लीकन संघाचा सदस्य झाला, ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमील, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने, व्यवस्था विवाह टाळण्यासाठी ते घर सोडुन कानपुरला निघुन गेले. एका पत्रात त्याने लिहीले 'माझ जिवन हे सर्वोत्क्रुष्ट कामासाठी मी समर्पीत केलय, जे की  देशाचे स्वतंत्र्य आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा भौतीक सुख मला आमि़ष करु शकत नाही'.

भगतसिंगांचे व्यासंग
                   भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबर्‍याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशनाआधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनेते-
        भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.

स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य-
            ९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.
                        भारत-पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला, जिल्हा फिरोजपूर,पंजाब नजीक उभारलेले भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे
खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले  आरोपपत्र हॊय.

आरोपपत्र -
                    "वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.
                 हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्‍न केला :-

१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.

२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बाँब व स्फोटके यांची निर्मिती करणे.

३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्‍या पोलिस वा इतर अधिकार्‍यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्र्‍या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्‍या लोकांचे वध करणे.

४) आगगाड्या उडविणे.

५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे.

६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे.

७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि,

८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.

              सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.

भगतसिंगांचे विचार -
                   बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
             समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
                    समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.
           हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: 
'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'

          भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते. ते म्हणत "जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है!"

शहीद भगतसिंग आणि गांधीजी -
                     भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. 
         महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
                कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."
                भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.

भगतसिंगांचे नास्तिकत्व-
             ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे शहीद भगतसिंग हे नास्तिक नसल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या संग्रहालयात आयोजित एका प्रदर्शनात करण्यात आला आहे. कम्युनिझमवर निष्ठा असणारे भगतसिंह आस्तिक असल्याचे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
                   भगतसिंग हे नास्तिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग यांनी या गीतेचे अध्ययन केले होते. नास्तिक माणसाला जगातील कुठल्याही धार्मिक पु्स्तकाचा अभयास करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय भगवद्गीता हे धार्मिक पुस्तक नाही.
          संग्रहालयाचे क्युरेटर नरुल हुड्डा यांनी हा दावा केला असून, २७ सप्टेंबर २००८ ते ३१ मार्च २००९ पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. यातच ८ एप्रिल १९२९मध्ये त्यांनी सेंट्रल असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बच्या अवशेषांसह एक गीताही ठेवण्यात आली आहे.
       या गीतेवर भगतसिंग सेंट्रल तुरुंगात लाहोर असे लिहिण्यात आले आहे. परंतु भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी मात्र ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.
            शहीद भगतसिंगांचा "मी नास्तिक का झालो" हा निबंध प्रसिद्ध आहे. त्यामुळे भगतसिंग नास्तिकच होते यांत शंका नाही.
            या निबंधामुळे भगतसिंग  नास्तिक आहे कि नाही हा वाद बंद झाला. 

'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग (वय २३ वर्षे)
                "त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.
          'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? 
                एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.
           जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.

संग्रहालय -
                     अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलाँ येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे.

दफनभूमीवरील स्मारक -
                      भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता.भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.

पुस्तके-
          भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही निवडक पुस्तके :-

आम्ही कशासाठी लढत आहोत? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)
भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे (नॅशनल बुक ट्रस्ट)
मार्टियर ॲज ब्राइड-ग्रूम (इंग्रजी, ईश्वरदयाल गौर)
विदाउट फिअर, द ट्रायल ऑफ भगतसिंग (इंग्रजी, कुलदीप नय्यर) (मराठी अनुवाद - शहीद भगतसिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास - भगवान दातार)
शहीद भगत सिंह : समग्र वाङ्मय (संपादक - दत्ता देसाई)
सरदार भगतसिंग (संजय नहार)
मी नास्तिक आहे का ? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)
  🇮🇳 इन्कलाब जिंदाबाद  🇮🇳
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

    🙏 विनम्र अभिवादन 🙏

    ♾♾♾♾♾♾♾♾♾♾
         संदर्भ ~ WikipediA                                                                                            
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
        🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
               ▬ ❚❂❚❂❚ ▬                                                      
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
    💥⛓🔫🇮🇳🙅‍♂🇮🇳🔫⛓💥

           शिवराम हरी राजगुरु

        जन्म : 24 आॕगष्ट 1908  
(खेड, पूणे, बाॕम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत)

        फाशी : 23 मार्च 1931
 (लाहोर, ब्रिटिश भारत - सध्या पंजाब, पाकिस्तान)

               वय : 22 वर्षे

              भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वापैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्विकारले. त्या क्रांतिकारकांची आठवण होताच तीन चेहरे आपसुकच डोळ्यांसमोर येतात. ते म्हणजे - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव.  राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्ती या दोन गुणांचे त्यांना जणू वरदानच लाभले होते. 
             राजगुरू यांचा जन्म 24 ऑगष्ट 1908 ला पुणे जिल्हयातील, खेड येथे झाला होता. ते अवघे 6 वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे अल्प वयातच ज्ञानार्जन व संस्कृत शिकण्यासाठी काशी येथे गेले होते. तेथे त्यांनी हिंदु धर्मग्रंथांसोबतच वेदांचाही अभ्यास केला होता, परंतु 'लघु सिध्दान्त कौमुदी' सारखा क्लिष्ट ग्रंथसुध्दा अल्प वयातच मुखपाठ केलेला होता. त्यांना व्यायामाची आवड होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे प्रशसंक होते.
           वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी घर सोडले. घर सोडण्यामागे त्यांचे कारण देखील वेगळे होते. इंग्रजी विषयात नापास झाल्याने मोठ्या भावाने त्यांना आपल्या नववधूसमोर इंग्रजी धडा वाचायची शिक्षा सुनावली. अर्थातच राजगुरूंना ते काही जमले नाही आणि झाला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. शेवटी संधी साधून जसे होते तसे, आईने तेल आणायला दिलेले 9 पैसे आणि बहिणीने अंजीर आणायला दिलेले 2 पैसे असे एकूण 11 पैसे घेऊन त्यांनी घरातून धूम ठोकली ती कायमचीच.
             सर्वप्रथम त्यांनी नाशिकला काही काळ वास्तव्य केले आणि नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोहोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले. काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे सा-या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असत. याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूचे निडर व्यक्तीमत्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामिल करुन घेतले. त्या क्रांतिमय वातावरणात वावरतांना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.
             याचवेळेस शिव शर्मा नावाच्या एका सहका-यासोबत दिल्लीमधील एका फितुराला ठार करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पण पिस्तुल एकच असल्याने पंचाईत होती.
कारण तो फितुर क्वचितच घराबाहेर पडत असे. त्यामुळे तेव्हा तो बाहेर पडेल तेव्हाच त्याला मारणे सोयीचे होते. त्यासाठी दोघाकडे पिस्तुल असणे आवश्यक होते. अन्यथा जोखीम पत्करावी लागली असती. राजगुरूंना थांबायला सांगून शिव शर्मा पिस्तुल आणण्यासाठी लाहोरला गेले. पण त्यांना पिस्तुल काही मिळाली नाही. जवळपास तीन दिवसांनी ते दिल्लीहून परतले आणि फितुराच्या घराजवळ पाहतात तो काय भलामोठा पोलीस पहारा आणि सर्चलाईट्स होत्या. शिव शर्मा काय समजायचे ते समजले. तो फितुर संध्याकाळच्या वेळेस 7 ते 8 च्या दरम्यान बाहेर पडत असे. त्याच संधीचा फायदा घेऊन राजगुरूंनी एकटयाने मोहिम फत्ते केली होती !  पाठी लागलेल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवीत राजगुरू पळत मथुरेच्या दिशेने निघाले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी दिल्लीच्या पुढील दोन स्थानके  काळयाकुट्ट अंधारात रेल्वे पटरींतून पळत पार केली.
          सायमन कमिशनविरूध्द 30 ऑक्टोबर 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. "गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचे निधन झाले. 
            पंजाबकेसरी लाला लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणा-या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला. राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालींवर पाळत ठेवून होता. पण 4 - 5 दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही. 
            अखेर दुस-या दिवशी एक गोरा अधिकारी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरुंना खूण केली. पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली. परंतु राजगुरूचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरुंनी त्या गो-या अधिका-यावर गोळी झाडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गो-या अधिका-याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यात मात्र ते यशस्वी झाले . नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून साँडर्स होता. 
            माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले. इकडे मारेक-यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते. पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळया एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत, आणि 1929 सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.

            त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरुंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते.
             पुढे कारावासात शिक्षा भोगत असतांना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहाकाच्या सोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपला क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही. अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये 23 मार्च 1931 ला संध्याकाळी 7.33 ला फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या  निखान्यांची धग विझली. त्यांच्या बलिदानाचा 23 मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
             स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणाची आहुती देणा-या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपर्वात अढळ करणा-या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा !!
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🙏🌷

   ♾♾♾♾♾♾♾♾♾♾
     स्त्रोत ~ inमarathi.com                                                               ➿➿➿➿➿➿➿➿➿
   💥⛓🔫🇮🇳🙅‍♂🇮🇳🔫⛓💥
  शहीद सुखदेव रामलाल थापर
        (भारतीय क्रांतिकारक)

        जन्म : १५ मे १९०७
     नौघरा, लुधियाणा (पंजाब)
       फासी : २३ मार्च १९३१             आई : श्रीमती राल्ली देवी 
वडील : श्री. रामलाल थापर 
संघटना : नौजवान भारत सभा 
     
     भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्ली देवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.
                    सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र,भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले :

(१) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे.
(२) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे.
(३) जातियतेविरुद्घ लढणे
(४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे.

या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.
                 नोव्हेंबर १९२८ मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन लाहोरला आले असता निदर्शनाचे नेतृत्व केले होते. निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीमारामध्ये ते घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स याचा गोळ्या झाडून वध करण्यात आला. या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग असल्याने भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पक्षपाती, वसाहतवादी दृष्टीने ग्रासलेल्या न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सुखदेव आणि त्यांचे साथीदार भगतसिंग, राजगुरु यांना खटल्यातून सोडविण्याचे प्रयत्न म. गांधीजींनी केले; मात्र त्यांना त्यात यश आले नाही. लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले. ब्रिटिश सरकारच्या या अन्यायी, पक्षपाती वृत्तीमुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. फासावर चढविण्याअगोदर काही वेळापूर्वी सुखदेव यांनी म. गांधीजींना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्यांनी क्रांतीकारकांबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन प्रमुख विचारधारांवर प्रकाश टाकला आहे. सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी आली; मात्र त्यांनी ती बाणेदारपणे अव्हेरली. या आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो.

क्रांतिकारक सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
♦️ शहीद सुखदेव यांच्या जीवनचरीत्रावर काही सुविचार
“जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले”
“त्याग करून आपल्या सुखांचा, फासावर गेले त्रिदेव, शत-शत नमन तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव”
“मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व आपले विसरून गेले, नतमस्तक मी तयांच्या चरणी, जे देशासाठी शहीद झाले”        
      
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🙏🌷

      ♾♾♾♾ ♾♾♾♾
          स्त्रोत ~ Vikaspedia                                                                ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...