सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

स्वराज्याची पहिली लढाई

⚜️ स्वातंत्र्याचा का अमृत महोत्सव ⚜️

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬ 

संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                                                                  
      🚩🏇🤺🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🤺🚩

    ⛳ स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई 🤺


          स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.

विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

आदिलशहाने शहाजी राजांना कपटाने कैद करून शिवाजी राजांवर फतेहखानास पाठविले होते, बंगरुळास थोरले बंधू संभाजीराजांवर पण विजापुरी फौजा चालून गेल्या होत्या, राजकारणाचे धडे ज्यांच्या हाताखाली गिरवले होते ते गुरुतुल्य दादोजी कोंडदेव मृत्यू पावले होते.

अशा या संकटकाळी मनाचे स्थैर्य ढळू न देता शिवाजी राजांनी खळद- बेलसर येथील फतेहखानाच्या छावणीवरच हल्ला करण्याचा बेत आखला. या तुकडीचे नेतृत्व होते एका साठ वर्षाच्या तडफदार तरुणाकडे ते म्हणजे बाजी पासलकर. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.

छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एकारात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.

मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. या लढाईत विजापुरी फौजेशी मावळ्यांनी कडवी झुंज दिली पण विजापुरी फौजेच्या रेट्यापुढे मावळ्यांना माघार घ्यावी लागली. या लढाईत बाजी पासलकरांनी पराक्रमाची शर्थ करून रणदेवतेला आपल्या प्राणाची आहुती दिली.

बाजी पासलकरांचा देह पडताच मराठा स्वारांचा जमाव फुटला. मराठ्यांच्या निशाणाचे पथक मुख्य फौजेपासून अलग पडले. निशाणाच्या तुकडीस यवनांच्या सैन्याचा गराडा पडला, एक एक स्वार कापू जाऊ लागला. निशाणाची होऊ घातलेली दुर्दशा पाहून एक मराठा स्वार विजेच्या चपळाईने त्या गर्दीत आपली तलवार चालवत घुसला.

एकाच झटक्यात पाच सहा शत्रू कापत त्याने निशाणाचा स्वार मोकळा केला आणि आपल्या बरोबर चालविला, एवढ्यात निशाणाच्या स्वारावर शत्रूचा घाव बसून तो घोड्याखाली आला. हे पाहताच त्या निशाणाच्या स्वारास आपल्या घोड्यावर बसवून निशाणाचा भाला आपल्या खांद्यावर टाकून तो शूर पुरंदरास सुखरूप परत आला. या लढवय्याचे नाव होते बाजी जेधे.

हे बाजी जेधे म्हणजे कान्होजी नाईक जेधे यांचे पुत्र आणि बाजी पासलकर यांचा नातू (मुलीचा मुलगा). याच लढाईत आणखीन एका बाजीने पराक्रम गाजविला होता ते म्हणजे बाजी नाईक बांदल, बांदलांच्या जमावाने मोठा पराक्रम गाजवत विजापुरी सैन्याचा मुकाबला केला होता, या लढाईत बांदलांचे सुमारे अडीचशे लोक कामाला आले.

या तिनही वीरांचा यथोचित सत्कार शिवाजी राजांनी पुरंदरची लढाई संपल्यावर केला. बाजी पासलकरांच्या धाकट्या बंधूंना मोसे खोऱ्याची देशमुखी देऊन “सवाई बाजी” हा किताब दिला. बाजी जेधे यांना “सर्जेराव” हा किताब देऊन वस्त्रे आणि दोन तेज तुर्की घोडे बक्षीस दिले. बाजी नाईक बांदल यांना शिवाजी राजांनी मौजे भाणसदरे व पऱ्हर खुर्द या गावचे महसूल इनाम म्हणून दिले.

स्वराज्यासाठी लढल्या गेलेल्या लढायांमध्ये खळद-बेलसरची लढाई हि एकमेव लढाई असेल ज्या लढाई मध्ये एक नाही, दोन नाही तर तीन तीन बाजींनी आपल्या प्राणांची “बाजी” लावून स्वराज्याठाई आपली निष्ठा दाखवून दिली होती. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
          🚩 हर हर महादेव 🚩        

             🇮🇳 जयहिंद 🇮🇳   
              
   स्त्रोत ~ infomarathi.com                                                                                                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...