सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

श्री कृष्ण जन्माष्टमी


कृष्ण जन्माच्या निमित्ताने :-

कृष्णाला आपण देव म्हणून पुजतो. आपल्याला तो वंदनीय आहे. भगवद्गीतेचा रचैता, जी भगवद्गीता आपण आपला धर्मग्रंथ मानतो पण वाचत नाही, समजून घेत नाही, आचरणात आणण्याची तर गोष्टच लांब ! 

श्री कृष्ण काय होते आणि आपण त्यांना कसे गुरु करू शकतो हे लक्षात घेतले तर निव्वळ मज्जाच !  
कृष्ण हा मुत्सद्दी, तत्त्ववेता, शिष्टाई करणारा, व्ह्यूवरचनाकार, प्रेरक, मार्गदर्शक, मित्र, सखा, प्रियकर, पालक, बालक अशा अनेक भूमिकांमधून आपल्याला भेटतो.

 या कृष्णाच्या बाबतीत आपण त्याला निव्वळ देव म्हणून पुजण्यापेक्षा त्याच्या चरित्राचे अनुकरण करावे हीच त्याला खरी वंदना आहे.

 प्रत्येकाने कृष्ण व्हावे अथवा कृष्णासारखा सोबती सोबत ठेवावा म्हणजे जीवनात प्रत्येक क्षणी पावलोपावली जे कुरुक्षेत्र आपल्यासमोर येत असते त्यात सामोरे जाणाऱ्या लढायांना यशस्वीरित्या तोंड देता येईल. 

अर्जुनाला कुरुक्षेत्रावर त्याचे कर्तव्य बजावायला सर्व क्षमता सोबत असूनही अडचण आली होती. अर्जुन थांबला होता. अर्जुनाचे कर्तव्य हे धर्माचे कर्तव्य होते, अर्जुनाची लढाई ही धर्माची लढाई होती. तथापि अनेक विविध धारणा ज्या सत्यनसूनही सत्य असल्यासारख्या दिसत होत्या. त्यामुळे तो त्याच्या कर्तव्यापासून, त्याचे कौशल्य वापरण्यापासून परावृत्त झाला होता.

 त्याला तुझ्या भावभावना बाजूला ठेवून तुला आवश्यक ते कर्तव्य पार पाडणे कसे आवश्यक आहे आणि कसे सहज शक्य आहे आणि ते कसे धर्मानुरुप आहे हे समजून सांगणारा कृष्ण होता. कृष्णाच्या उपदेशंती अर्जुन लढाईस तयार झाला आणि त्यांनी ते अक्राळविक्राळ युद्ध जिंकले.

 वास्तविकता अर्जुनाला कृष्णाने उपदेश करण्यापूर्वी आणि कृष्णाने उपदेश केल्यानंतर त्याच्या युद्ध कौशल्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नव्हता. वास्तविक पाहता युद्ध कौशल्य हा कृष्णाचा प्रांतच नव्हता.

 कृष्णाला जी अनेक नावे आहेत त्यापैकी एक नाव रणछोडदासजी आहे. रणछोडदास म्हणजे जो रणांगणातून पळून गेला तो !  पण या अशा रणछोडदासांनी जगातल्या सर्वात मोठ्या युद्धात तात्कालीन सर्वश्रेष्ठ योध्याला लढाया प्रवृत्त केले, प्रेरित केले आणि त्याची कौशल्य वापरून ते युद्ध जिंकेल आणि धर्माला विजय मिळवून देईल अशी योजना केली.

 आपल्या आयुष्यातही आपल्या आजूबाजूला असे अनेक अर्जुन आहेत जे सर्व कौशल्य धारण करतात. तथापि त्यांच्या काही धारणामुळे कौशल्य वापरण्यापासून परवृत्त्त होतात, त्यांच्या कुरुक्षेत्रावरील लढाया लढत नाहीत आणि जिंकण्याची क्षमता असतानाही पराभूत होत राहतात.

 अशा सर्व अर्जुनांसाठी आपण कृष्ण बनून त्यांना त्यांच्या लढाया जिंकण्यास प्रवृत्त करू शकतो.

 त्यासोबतच आपल्या सोबतही अनेक प्रश्न असतात. आपणही क्षमता असूनही आवश्यकता असूनही कौशल्य असूनही आपल्या जीवनात पावलोपावली आपल्यासमोर येणाऱ्या कुरुक्षेत्रांवर मर्दुमकी गाजवण्यापासून आपल्या धारणामुळे परावृत्त्त होत असतो. पण आपण त्या कृष्णाचे ऐकत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

 असे आपल्या आयुष्यातील कृष्ण ओळखून त्यांच्या प्रबोधनाचा लाभ घेऊन आपण आपल्या लढाया जिंकण्याचा निर्धार कृष्ण जन्माष्टमी निमित्त करूया !
🙏🌹🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...