बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

पांगुळगाडा (भाग - 2) लेखक - श्री वासुदेव पाटील

#पांगुळगाडा

         🔖 भाग ::-- दुसरा

      ✒️ वा......पा.............

   वायकराची घारी करडी नजर दोन्ही मोरबी, तापी काठ व पंचक्रोशीत भिरभिरत होती. पण त्यांना काहीच सुगावा लागेना. पांगुळगाडा ज्या सौंदळच्या झाडाखाली पडला होता तेथून पात्राचं जे अंतर होतं ते एक सव्वा वर्षाचं पोर सहसा पार करु शकत नाही. म्हणजे पोरास तेथून कुणीतरी पात्रात घेऊन गेलं असावं! पण कोण? सजन तात्याचे गावात संबंध एकदम सलोख्याचे! माणूस अजातशत्रू! मग घेऊन जाणारा कोण? बरं पात्रात टाकलं तर प्रेत एव्हाना वर आलं असतं. दूर दूर काठावरील गावात प्रेत सापडल्याची बातमी नाही! मग पळवून कुठं नेलं असावं? का? वायकर  सिगारचा कस घेत वलय सोडत मेंदुचा किस पाडू लागले. समोर जमा केलेला पांगुळगाडा पडलेला. पांगुळगाडा अतिशय दणगट व सुबक बनवलेला! एक लहान मूल हा गाडा घेऊन मागच्या गेटजवळच्या पायऱ्या उतरुच शकत नाही. एकतर तो कोलमडून पडला असावा. पडल्या बरोबर भोकांड पसरल्यावर सात आठला मंदिरात गर्दी असतेच. कुणी तरी नक्कीच ऐकलं असतं. पण असं काहीच न होता तो सौंदळपर्यंत पोहोचतोच कसा? नाही! कोणीतरी सराईतपणे घेऊन गेलाय! पण मग घेऊन जाणारा कुणाच्या नजरेस का पडला नाही.
    आठ दहा दिवस सजन पाटलाकडे नुसता आक्रोश व जीव तोडून बाळाची वाट पाहणं सुरु होतं. हळूहळू आशा मावळायला लागली.

     गिरधन आबाच्या गयभूनं बारकू बोरसाकडं दरवाजा बनवण्यासाठी लाकडं टाकली होती. दरवाजा बनवून बरीच लाकडं उरली होती. 

" गयभू दा! या उरलेल्या लाकडाचं काय करायचं? घरी नेतोय का?" बोरसानं विचारलं.

" घरी नेऊन पसारा पेक्षा पांगुळगाडाच बनवा! आमच्या सोनूस कामाला येईल!" गयभू बोलला नी बोरसाचे हात पुन्हा थरथरले. त्यानं भितभितच रुकार भरला.
 पडलेली लाकडं परत ठेवण्यापेक्षा तो लागलीच कामास लागला.  सायंकाळी तप्ती काठावरुन टिटव्यांचा आक्रोश वर चढत चढत बारकू बोरसाच्या पत्री शेडवर कर्कशता आणू लागला. शेडच्या मागच्या शेतात आंब्याचं भलं मोठं झाड होतं. त्याच्या ढोलीत सायंकाळी घुबडाची जोडी दिसली. तशी ही जोडी दहा बारा दिवसापूर्वीच आली होती. पण आज बारकूस सायंकाळी ती नजरेस पडली. घुबडांची तीक्ष्ण नजर जणू आपणावरच रोखली असा भास त्याला जाणवला. तयार झालेला पांगुळगाडा  त्यानं आपल्या म्हाताऱ्यास गिरधन आबाकडं द्यायला पाठवलं. म्हाताऱ्यानं पांगुळगाडा उचलला व तो लहान मोरबीत चढू लागला. त्याच्या डोक्यावरच्या आभायात टिटव्या नुसत्या गचबुच गिल्ला करत होत्या.

     मंदीराचं वाल कंपाऊंड तयार होऊन दोन तीन महिने झाले होते. मंदीराच्या ट्रस्टचे अध्यक्ष असणारे गिरधन आबा गावातल्या श्रीराम पेंटरला आपल्या घरी बोलवून तासत होते. बोरसाच्या बापानं पांगुळगाडा दिला व ते माघारी फिरले.

" श्रीराम अख्ख्या तालुक्यातील कामं करतो नी गावचं मंदीराचं काम तुला जमत नाही रे? ज्या गावात राहतो त्या गावाचे असे पांग फेडतो?"

" आबा, माझं ऐका दुसरा पेंटर पहा! कारण माझ्याकडे वर्षापासूनची कामं पेंडींग पडलीत. मी रात्रंदिवस कामं करतो तरी सरकत नाहीत".

" श्रीराम! दुसरा पेंटर पाहिला असता तर एवढ्यात पुरं वालकंपाऊंड रंगवून झालं असत! मला ते काही माहीत नाही. हवं तर फुकट नको आम्हाला मजुरी घे पण गावचं काम तूच कर!"

" आबा, गावचं सार्वजनिक काम मी कधी मजुरीनं केलंय का, की याची मजूरी घेईन! काम मी असंच करीन! पण मला सवडच नाही म्हणून मी नकार देतोय!"

" मग असं कर हवंतर रोज रात्री थोडंथोडं कर! दिवसा तुझं आधीचं काम उरकव! "

श्रीराम पेंटरनं कसंनुसं तोंड करत रुकार भरला व तो उठला. गिरधन आबांनी प्रायमर व रंगाचे डब्बे त्याकडं लगोलग दिले. श्रीराम पेंटरनं सोबत आणलेल्या मुलाच्या मदतीनं ते सामान मंदीरात पोहोचतं केलं. लगेच गावातली दोन तीन माणसं पकडली व वालकंपाऊंडला प्रायमर मारावयास सुरुवात केली. रात्रभर स्वत: उभं राहत त्यानं प्रायमर मारला. श्रीराम पेंटर हाडाचा चित्रकार होता. कोणतीही पेंटीग तो लिलया साकारी. म्हणून वर्षभर आगाऊ त्याच्याकडे काम पडलेली असत. सार्वजनिक कामाची तो गावातून कधीच मजूरी घेईना.
रात्रभर प्रायमर मारल्यावर त्यानं हाताखालच्या माणसांना दिवसा रंग मारावयास ठेवलं व तो दुसऱ्या कामावर निघून गेला.

   गिरधन आबाच्या घरी गयभूचा एक वर्षाचा मुलगा सोनू व तीन वर्षाची मुलगी बाली दिवसभर पांगुळगाडा फिरवत धूम करत होती. बाली सोनूकडून पांगुळगाडा हिसकावत जोरात गरागरा घरभर फिरवी नी सोनू पाय पसरत जमिनीवर फतकल मांडत दात ओठ ताणत बोंबले.

" बाली ! तो लहान आहे त्याला दे नाहीतर तुला मी  झाडणीच्या बुडक्यानं बुकलेल!" लिला संतापू लागली. सायंकाळ पावेतो गिरधन आबाकडं हाच खेळ रंगला होता. सायंकाळ होताच आंब्यावरील घुबडाची जोडी गिरधन आबांच्या माडीच्या वरच्या वळचणीला आली.

        रात्री गावात येताच श्रीराम पेंटरनं कसंबसं जेवण उरकलं व तो मंदीरात आला. त्यानं गयभूस बोलवत आणखी लाईट आणावयास लावले. आज रात्री तो मजुरांनी रंगवलेल्या वालकंपाऊंडवर चित्रे काढणार होता. पण कालच्या रात्रीचं जागरण व दिवसाही झोप नाही म्हणून त्याचे डोळे मटमट करत बंद होत होते. त्याला झपकीवर झपकी येत होती. तसं तो रात्रंदिवस काम करी पण दिवसा वा रात्री दोन तीन तास तरी झोप काढी. पण आज झोपच झाली नव्हती.
   त्यानं मंदीराच्या लहान मोरबीकडं असणारं गेटजवळचं वालकंपाऊंड चितारावयास सुरुवात केली. मजूर आज थांबली नाहीत. कारण प्रायमर व रंगवणं संपलं होतं. आता चितारणं पेंटरचच काम होतं.

  श्रीराम पेंटरला लहान मोरबीकडून येतांना बाहेरुन मंदीराची आतली बाजू जी दिसायची तीच त्या गेटजवळच्या वाल कंपाऊंडवर चितारायची होती. त्यानं ब्रश व रंग घेत फर्ऱ्हाटे मारावयास सुरुवात केली. गेटमधून मंदीराचा जितका भाग दिसे तो त्यानं चितारावयास सुरुवात केली. विठ्ठल मंदीराची समोरची बाजू, त्यामागं दडलं असलं तरी डोकावणारं महादेव मंदीर, त्याजवळचा वड, पिंपळ , लिंब ,पटांगण तो चितारू लागला. पण हे चितारता चितारताच त्याच्या डोळ्यात झोप तरारली. तो चितारतोय की झोपतो हेच त्याला कळेना. घडीत आपण ब्रश ठेवून कंपाऊंडला टेकून झोपलोय ही जाणीव मेंदूत धडका देऊ लागली तर घडीत लगेच आपण ब्रश घेत जोमानं चितायतोय असली जाणीव नेणीवात नेऊ लागली. 

      वायकरनं आमले पोलीसास सोबत घेत पेट्रोलिंग सुरू केलं. मोठी मोरबी केल्यावर मंदीराजवळून ते लहान मोरबीत चढणार होते. तोच वालकंपाऊंड जवळ त्यांना कोणी तरी दिसलं म्हणून त्यांनी आमलेस गाडी तिकडं वळवावयास लावली.
 गाडीतून उतरत ते गेटजवळ जाताच वालकंपाऊंडला टेकून झोपलेला पेंटर दिसला. पण त्यापेक्षा  त्यांचं लक्ष चित्रावर गेलं. टांगलेल्या लाईटच्या उजेडात ते चित्राकडं एकटक पाहू लागले. गेटमधून घुसतांना दिसणारा समोरचा भाग जसाचा तसा दिसत होता. पेंटरची  अद्भुत कारीगरी पाहून ते स्तंभित होत बारकाईनं निरखू लागले. मदीर ,मधली झाडं, पटांगण समोरचं कोपऱ्यातलं तापीकाठाकडं उतरणारं गेट...अरे पण त्या गेटमध्ये काय दिसतंय? पांगुळगाडा? ते चित्राच्या अगदी जवळ सरकले. गेटमधून बाहेर निघणारा पांगुळगाडा! त्यांनी गेटमधून मध्ये पाहिलं तर समोर कोपऱ्यात गेट दिसत होतं पण पांगुळगाडा दिसत नव्हता. मग चित्रात यानं का चितारला? तो ही सजन पाटलांच्या नातूच्या घटनेत जमा केलेला पांगुळगाड्यासारखाच! वायकर एकदम धक्क्यात! त्यांनी भिंतीला टेकून झोपलेल्या पेंटरला दरडावत उठवलं. श्रीराम खडबडून गाढ झोपेतून जागा झाला.

" काय रे श्रीराम हे चित्र तू काढलं ना?"

" हो साहेब. चितारता चितारताच झोप लागली".

" चित्रात गेटमध्ये काय दिसतंय रे बघ?"

" बापरे! पांगुळगाडा? गेटजवळ हा कसा चितारला गेला? साहेब कदाचित झोपेच्या गुंगीत फर्ऱ्हाटे उलटसुलट मारले गेले असावेत"

पण उलट सुलट फर्ऱ्हाट्यानं चित्र बिघडलं असतं, इतकं साफ सुथरं चित्र आलंच नसतं हे वायकरांनी  ओळखलं.

" श्रीराम ! चित्र काढतांना तु मध्ये पाहून काढत असेल ना? आठवून पहा ! गेट चितारतांना पांगुळगाडा तिथं असावा?"

" साहेब! झोपेच्या धुंदीत मी काय चितारलं तेच आठवत नाही नी झोपच लागली" म्हणत श्रीरामनं भराभरा रंग मारत पांगुळगाड्याचं चित्र मिटवलं.

   वायकरला मात्र नवल वाटलं. वायकर तेथून पुढं  लहान मोरबीकडं सरकले. मोरबीत जाताच गिरधर आबांच्या माडीजवळ जोराचा गलका त्यांना ऐकू आला. त्यांनी गाडी माडीसमोर थांबवली. गयभू, गिरधर आबा, लिला सारे खाटेवर नसलेल्या आपल्या तीन वर्षाच्या बालीस शोधत होते.
खाटेवर झोपलेली बाली एक वाजता उठलेल्या गयभूस दिसली नाही म्हणून त्यानं  आपली पत्नी लिलास उठवलं. तिच्याजवळ सोनू झोपलेला. मग त्यांनी आबा, आई सर्वांच्या जवळ बालीस शोधलं पण बाली घरात कुठंच दिसेना. म्हणून घरात एकच गहजब उडाला. वायकर जाताच आजुबाजूंचे शेजारी ही उठले. शोधाशोध सुरू झाली. त्यातच गयभूस कालच बनवून आणलेला पांगुळगाडा ही खुंटीस दिसेना. मग तर संशय दाटावला. तात्याचा नातू साऱ्यांना आठवला. मग तर सारी मोरबीच जागे होत तपास करु लागली. शोधाशोध, रडारड, भिती, दहशत! दहा दिवसांत दुसरी घटना. 
   सकाळी तापीपात्रात पांगुळगाडा तरंगतांना दिसला. वायकरला कळताच ते धावतच काठावर आले.  बारकू बोरसानं बनवलेला हा दुसरा पांगुळ गाडा. पुन्हा पात्रात उड्या घेतल्या गेल्या. तळाचा ठाव घेतला गेला. पण भरलेली तापीमाय आपल्या उरात काय काय गुपीत दडवून‌ वाहत होती हे का सहजासहजी कुणास कळणार होतं! दुसऱ्या दिवशी बालीचं शव पात्रावर तरंगताना दिसताच शोध संपला व रडारड, आक्रोश सुरू झाला. पण वायकरचा शोध सुरू झाला.

दोन मुलांचं गायब होणं! पांगुळगाडा  घेऊन गायब होणं! समोर नसलेला पांगुळगाडा चित्रात दिसणं!  वायकर......वायकर......उठा, लागा कामाला......! काल तरंगणारा पांगुळगाडा काढतांना, आज बालीचं शव काढतांना टिटव्या आरडतच होत्या. पिंपळावरची लटकलेली वटवाघळं दिवसाच बिथरत होती. दिवसांध घुत्कारत होती! रात्रीचे वडा- पिंपळावर बसलेले बगळे वेळी अवेळी फडफडत कलकलत मोरबीच्या आभायात घिरट्या घालत होती. वायकर.....उठा...लागा ..कामाला! बारकू बोरसा मात्र पत्र्याच्या शेडमध्ये आपलं लाकूड तासत होता, रंधत होता कुस कोरतच होता!

क्रमश:......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...