मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

लघुकथा - पांगुळगाडा ✍ लेखक - श्री वासुदेव पाटील (संग्राहक - श्री अविनाश पाटील)

पांगुळगाडा .......

       🔖 भाग ::-- पहिला.

   सायंकाळी नारायणानं मावळतीला पथारी टाकली अन तापीकाठावरील मोरबीच्या वातावरणात आरतीचे स्वर घुमू लागले. हारपक सरत आलेला. शेतातून बैलगाडी, ट्रॅक्टरनं कापूस, मूग, उडीद ,चारा आणत जो तो घराकडं धाव घेत होता. डंगर ढोरांची डोभाण धुराळा उडवत गावात घुसू लागली.  गाडीच्या बैलाच्या गळ्यातील घुंगराच्या आवाजात  मंदिरातील 
"ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।|" 
आरतीचे गोड सूर  मिसळत निनादू लागले.

पश्चिमेकडील शिवारातून येणारा रस्ता मंदिराजवळ काटकोनात येत डाव्या बाजूला लहान मोरबीत व उजव्या बाजूस मोठ्या मोरबीत वळत होता. दोन्ही मोरबीच्या मधोमध उतारावर तापी काठावर विठ्ठलाचं मंदीर. विठ्ठलाच्या मंदीरालगतच महादेवाचं जुनाट व काहीसं भग्न देऊळ. देवळाच्या पूर्वेस जवळच तापीचं भरलेलं खोल पात्र. तेथूनच आठ - दहा  किमीवर बांधलेल्या बॅरेजचं पाणी  दोन्ही काठ सांधत सबडब करत लाटाटत होतं. 

    दोन्ही मंदीरास विस्तीर्ण व दोन्ही मोरबीस जोडणारं वाल कंपाऊंड चालूच बांधलेलं.  वालकंपाऊंडच्या पश्चिमेस शिवारातून येणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस तीन चार महिन्यापूर्वीच बारकू बोरसेचं खटलं नवीन आलेलं. गावठाण जमिनीवर पत्र्याचं शेड ठोकत त्यानं आपला धंदा सुरू केलेला. सोफा, दिवाण, बंगळी, दरवाजा, टेबल असं फर्नीचर बनवत मोरबीत जोरदार धंदा सुरू. मोठ्या कामातून उरलेल्या लाकडात तो थरथरत्या हातानं आताशी पांगुळगाडा ही बनवू लागला. एका वर्षापासून त्यानं पांगुळगाडा बनवणं सोडलंच होतं.
आरती होताच सजन पाटील आपल्या सव्वा वर्षाच्या नातवास घेत मंदिरासमोरील पटांगणात आले. नातू बारकू बोरसा कडून कालच आणलेला पांगुळगाडा मजेत फिरवत होता. सजन पाटील नातवाचे वाकडे तिकडे पडणारे पाऊल, जाणारा तोल, बोबडे बोल हारीखानं पाहत नातवामागं फिरत होते. पांगुळगाडा कुठं अडला की हळूच धक्का देत चालता  करत होते. नातू किलकारत पटांगणात फिरत होता. 
    झापड पडताच गावातून मुलं, बाया पणती दिवाटणी घेऊन येत होते. महादेवाजवळ दिवाटणी लावत दर्शन घेत परत फिरत होते. काही विठ्ठलाला फेऱ्या घालत होते. मंदीराजवळील पिंपळ, वडाच्या झाडावरील दिवसभर उलटी लटकलेली वटवाघळं आता उडत रानात तापीपल्याड जाण्याच्या तयारीत असतांनाच तापीपल्याडहून बगळे येत वडा- पिंपळावर स्थिरावत होते. 
   सजन पाटलाची सून गौरी आली. देवदर्शन घेत परततांना पांगुळगाड्यासोबत तोल सांभाळत चालणाऱ्या मुलाकडं  भरल्या काळजानं पाहिलं. मुलाचं लक्ष आईकडं जाताच तो गाडा तिकडं वळवत धाव घेऊ लागला.

  " गौरी! अंधार पडलाय. आता त्याला घरी ने. मला मोठ्या गावात बंका बापूस भेटायला जायचं असल्यानं घरी यायला उशीर होईल" सजन पाटील सुनेस म्हणाले.

गौरीनं बाळास उचललं. 

" पांगुळगाडा राहू दे. मी कुणाकडं तरी पाठवतो!"

 गौरी बाळास घेत बाहेर आली पण गाडा घेतला नाही म्हणून मुलगा भोकांड पसरू लागला व परत पटांगणाकडं जाण्यासाठी धडपडू लागला. गौरीला घरी स्वयंपाकही करायचा असल्यानं पुढच्या फाटकातून‌ तिनं मुलास सोडलं. 

" तात्या! हा ऐकत नाही .याला इथंच खेळू द्या तुमच्यासोबत! म्हणत ती निघाली. पण त्याच वेळी बंका बापू येतांना दिसल्यानं व मंदीरातली मोठी घंटा कुणीतरी जोरानं बडवल्यानं पितळी घंटेच्या नादात गौरी काय म्हणाली हे तात्यांना समजलंच नाही. त्यांना वाटलं गाडा घेण्यासाठी नातू आला असावा. तात्या बापूंशी बोलण्यात गुंतले.
   मुलानं गाडा घेतला व  फाटकाकडं निघाला. पण......
 तात्या आपल्या पुतण्याच्या सोयरिकीबाबत बंका बापूशी बोलत बसले व नंतर बोलता बोलता त्यांच्यासोबतच मोठ्या मोरबीत निघाले. तात्या नऊ - साडे नऊ वाजेपर्यंत बंका बापूच्या घरीच थांबत घराकडे परतले. तात्यासोबत मुलगा न दिसताच गौरीनं धास्तीनं
 "तात्या!  बाळा?" चौकशी केली. 

" बाळाला तर तू आणलं होतं ना?"

" नाही हो! तो रडत असल्यानं मी परत पाठवलं तुमच्याकडं नी तुम्हास तसं सांगितलं ही! मग?"

बस्स! साऱ्या घरात कावकाव व धावपळ उडाली. तात्या, रखमा, इसन, गौरी सारे बाळास शोधायला धावले. आधी सरळ मंदीर गाठलं. आता मंदीरातली गर्दी केव्हाच पांगली होती. पटांगणातील खांब्यावरील लाईट दुधी  प्रकाश लिंबाच्या, वडाच्या झाडावर फेकत होते. वडा पिंपळावर बगळ्यांनी आपापली जागा पकडत समाधी घेतली होती. एक दोन चुकार बगळे उडत होते. पण वडाच्या ढोलीतलं दिवसांध भोऱ्यागत कोकलत होतं . तापीकाठावर टिटव्या आकांत मांडत होत्या. तात्या, इसन यांनी सारा मंदिराचा परिसर धुंडाळला.  परत ते  दोन्ही मोरबीत भेटेल त्याला विचारू लागले. पण 'बाळाला पांगुळगाड्यासोबत खेळतांना पाहिलं' एवढं एकच उत्तर. तात्या व इसन गारठले. भितीनं ते गाव, गल्ली, घर धुंडू लागले. गौरी तर छातीच पिटू लागली. तात्या इसन मागं गर्दी जमली. खेळतं पोरगं अचानक गायब कसं होऊ शकतं हाच ज्याच्या त्याच्या तोंडी सवाल. सारी गर्दी विजेऱ्या घेत पुन्हा मंदीरात आली. विठ्ठल मंदीर, महादेवाचं देऊळ झाडं फुलझाडं एकेक कोपरा तपासला जाऊ लागला. वाल कंपाऊंडमधला सारा परीसर पिंजून झाला. वडावर घुबड घुत्कारच होतं. टिटव्या नदीपात्राकडून टिटिव टिव..! टिटिव टिव..! टिव टिव टिटिव... गिल्ला करत गावाकडं सरकत होत्या. काठाकडून कुत्री रडत होती. आता सारी गर्दी वालकंपाऊंडच्या नदीकडं जाणाऱ्या फाटकातून नदीकडं निघाली. नदीकाठावर सारीकडं झावर पांघरुण बसल्यागत सौंदळीची झाडं गुपीत दडवून बसल्यागत भासत होती. काठावरील नदीची खोरी धुंडाळली जाऊ लागली. काही खोऱ्यात पात्रातलं पाणी कचऱ्यासह तुठलेल्या चपल्यासह लाटाळत होतं. तोच गिरधन आबाच्या गयभूस सौदळीच्या झाडाखाली पांगुळगाडा दिसला. त्यानं गाडा उचलत साऱ्यांना दाखवला. पांगुळगाडा सापडताच तात्या नातवाच्या नावानं हंबरडाच फोडू लागले. 

" देवा! मी पापी! मीच माझ्या नातवास सांभाळू शकलो!"

तर घरी ही हे कळताच गौरी झिंज्या तोडत छाती बडवत आकांतू लागली.

साऱ्या गावानं अंदाज बांधला की तात्याचा नातू नदीपात्रातच पडला असावा. शहाणी डोकी तात्यास उठवत घरी नेत समजावू लागली.

" तात्या! धीर धरा. बाळाचा पांगुळगाडा पाण्यापासून एवढ्या अंतरावर सापडलाय तर तो पात्रापर्यंत जाऊच शकत नाही. पांगुळगाडा तिथं टाकून कुणीतरी बाळास नेलंय! सकाळी बाळास आणतीलच!"

पण इसन, तात्या, गौरीची समजूत पटेना.

 पुन्हा गावातील ठोले तरणे गोळा झाले. इसनला घेत भोई लोकांना घेत काठावर आली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात धडाधड उड्या टाकल्या. पण अंधारात हाती काहीच गवसणार नाही हे त्यांनाही कळत होतं. पंधरा वीस फूट तळ. त्यात जागा नक्की नाही. तरी मंदीराजवळच्या पात्रात शोध घेतला जाऊ लागला. पात्रावरील आकाशात टिटव्या रान माजवत होत्या. कुत्री रिसडतच होती, रडतच होती. खोल पाण्यात दम कोंडत असतांनाही उड्यावर उड्या घेतल्या जात होत्या. पण हाती काहीच लागत नव्हतं. सारे नाउमेद‌ होत सकाळी उजेडात पुन्हा पाहण्याचं ठरवत परतली. किसन पाटलाचं घर रात्रभर झोपलंच नाही. हातातल्या हातात मूल नाहीसं झालंच कसं? नजर एकदम बांधली गेलीच कशी यानं ते ऊर तोडत होते.

 सकाळी पूर्ण पात्र शोधून झालं. हातास काहीच लागेना. गावातल्या ठाण्यात मिसींग केस नोंदवली. इन्स्पेक्टर वायकर अतीशय कर्तव्यदक्ष व हुशार माणूस.
  भोई लोकांनी अंदाज बांधला की पोरगं पाण्यात पडलं असेल तर गाळात रुतलं असेल वा वाहत पुढे सरकलं असलं तरी फुगून वर येईलच. म्हणून प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. ते काठा काठानं तुंबलेल्या खोऱ्यात फिरू लागले.

   इन्स्पेक्टर वायकरांनी किसन पाटील व सुन गौरीचे जुजबी जबाब घेतले. इन्स्पेक्टर वायकरांनी मंदीराचा सारा परीसर आपल्या नजरेनं धुंडाळला. मंदीराच्या आवारातून पांगुळगाडा ढकलत वालकंपाऊडच्या बाहेर जाण सव्वा वर्षाच्या मुलास शक्य नाही. नी मग तेथून सौंदळच्या झाडाजवळ? शक्य नाही. कुणी तरी नक्कीच घेऊन गेलं असेल!
 
" तात्या, तसं तर शक्यता नाहीच पण तुम्हास कुणावर शंका?"

" साहेब आमचं पुरं खानदान पापभिरू! मी कुणाचं वाईट केलंय की त्यांनी माझ्या नातवास  न्यावं...?"

इन्स्पेक्टर नं पांगुळगाडा जमा केला व ते ठाण्यात परतले...


क्रमश:.......


✒️ वा.........पा..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...