सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

✍सुविचार🙏

✍ आजचे सुविचार 👍


1️⃣ "पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाचे असतात; कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते."

2️⃣ तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, असं मला वाटतं.

3️⃣ लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे.

4️⃣ कोणतेही काम मन लावून करावे.

5️⃣ जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे.

6️⃣ इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे.

7️⃣ शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा तो चांगलं काम करतो.

8️⃣ शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण त्यांना शिपाई हे पद कमी महत्त्वाचे वाटते. म्हणून पद कोणतही असो. त्याचा मनापासून स्विकार करा व त्यात स्वत:ला झोकून द्या.

9️⃣ आजची मुले सुदैवी आहेत; कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात. त्या गोष्टींच चिंतन, मनन करा. त्याविषयी चिकित्सक बना.

1️⃣0️⃣ आज-काल मुलांना कार्टूनची नावे पाठ असतात, पण झाडांची नावे विचारली, तर दहा सुद्धा सांगता येणार नाहीत. शेवटी काय महत्त्वाचं हे लक्षात घ्या.

1️⃣1️⃣ माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही. म्हणून विचाराने प्रगल्भ व कर्तुत्त्वाने मोठे व्हा.

1️⃣2️⃣ मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे चित्रच बदलून जाईल.

1️⃣3️⃣ पाण्याचे वाया जाणारे थेंब हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. म्हणून पाण्याचे महत्त्व जाणा.

1️⃣4️⃣ जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. म्हणून चांगले गुणी बना कारण ज्यांच्याकडे चांगले गुण असतात, ती माणसे जीवनात कोणतेही ध्येय प्राप्त करू शकतात. कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात.

1️⃣5️⃣ आपण निसर्गाकडे लक्ष देत नाही. त्याच्याविषयी आपल्या मनात जिव्हाळा नसतो. म्हणून अनेकदा कोणालाही दहा झाडांची किंवा पक्ष्यांची नावे सांगता येत नाहीत. प्रत्यक्ष निसर्गाशी मैत्री केल्याशिवाय हे घडणे शक्य नाही. गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची आहे. निव्वळ भौतिक प्रगती माणसाला जगण्यासाठी पुरेशी नाही.

1️⃣6️⃣ परदेशातला निसर्ग पाहण्यापेक्षा स्वतःच्या देशातला निसर्ग समृद्ध केला पाहिजे. खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय करणारे खूप असतात, पण गवई होणे, उत्कृष्ट लेखक होणे किंवा उत्कृष्ट शेतकरी होणे हे सुद्धा खूप महत्वाचे असे व्यवसाय आहेत.

1️⃣7️⃣ काहीतरी भव्यदिव्य करता आले पाहिजे.

1️⃣8️⃣ मुलांनी मनसोक्त जगले पाहिजे. उत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगाने वाखाणणी केली पाहिजे. कालांतराने लोक तुमचे काम बघतात. तुम्ही परीक्षेत किती गुण मिळवले हे बघत नाहीत.

1️⃣9️⃣ ठरावीक उच्च पदाचाच सगळ्यांनी ध्यास बाळगणे योग्य नाही. ते उच्च पद मिळाले नाही म्हणून नाईलाजाने काहीतरी स्वीकारले जाते. याने जीवनातला आनंद मिळू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने त्या त्या पदाला आपलं मानून, समजून प्रामाणिक कार्य केल पाहिजे.

2️⃣0️⃣ प्रत्येकाने स्वतःचे काम निष्ठेने केले तर काम चांगले होते. काम करणाऱ्याला काम करण्याचा आनंदही मिळतो. शिवाय, त्या कामाला आणि काम करणार्‍यालाही प्रतिष्ठा मिळते.

    अशा  प्रकारे सगळे वागले तर समाजाचा दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाही.

संकलन लेखन~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

लोकप्रिय लेखक मा. श्री.अरविंद जगताप यांच्या 'आप्पांचे पञ' या पाठातून काही निवडक वाक्ये.

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

✍आजचा सुविचार✍

🌺 जीवन विचार🌺 
➖➖➖➖➖➖➖
शुभ रविवार.......

तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.आपण आपल्या तनमनात सदैव भलेपणाची,चांगुलपणाची,मांगल्याची,निस्वार्थीवृत्तीने जीवन  जगण्याची तेजोमय ज्योत तेवत ठेवली पाहिजे.
'कर्मे ईशू भजावा'.आपण आपल्या कामालाच आपले दैवत मानले पाहिजे. व प्रामाणिकपणे, इमान इतबारे आपले काम करीत राहीले पाहिजे त्यासाठीच आपला देह झिजवला पाहिजे.आपल्या कामाची पूजा केली पाहिजे.आपल्या कार्यातच आपल्याला ईश्वर प्राप्त होतो.
    
📚स्वामी विवेकानंद🙏🏻
माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी.
पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर (मुखी राम बगल मे सुरी)
अशा प्रकारचे देखावा करणारे लोक चांगल्या  व्यक्तीच्या कामात विनाकारण अडथळा निर्माण करीत असतील तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.
कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठं ?आणि कसे दाखविल हे?????? 
〰〰〰〰〰〰
 🙏🏼संकलन🙏
✍ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे
~~~~~~~~~~~~
〰〰〰〰〰〰

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

कोजागिरी पौर्णिमा - श्री अविनाश पाटील

कोजागरी पौर्णिमा

शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.

कोजागिरी पोर्णिमा !  कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवताचे आराधान करावे. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पोर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला. काही भागात नवीन पिके हाताशी आलेली आहेत. अनेक भागातील ही नवात्र पोर्णिमा!

या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत, रास व गरबा खेळत, आठवनीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो.
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.

अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्ल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी बशरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!

चला तर मग … कोजागरी साजरी करूया … मसाला दूध पिऊया … धम्माल करुया !!!

माहिती संकलन: श्री अविनाश पाटील 

स्त्रोत: बालपण

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️


       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳

            ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                             ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
📡🚀🛰️🇮🇳👮‍♂️🇮🇳🛰️🚀📡

                 भारतरत्न
अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम
                       तथा  
            ए. पी. जे. अब्दुल कलाम
(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)
       जन्म : १५ ऑक्टोबर १९३१
                (रामेश्वर)
       मृत्यू : २७ जुलै २०१५
                (शिलाँग)
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

🚀 कार्य 🛰
                १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
 📚 शिक्षण :-
             त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 ♦ स्वभाव :-
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
 
🥇 गौरव :-
                    अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
 🎯 निधन :-
               ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
        🇮🇳  जयहिंद 🇮🇳
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷
            ♾♾♾♾♾♾
           संदर्भ - Wikipedia                                                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील    📲 8796759702  
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                                
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🗣️📔🇮🇳👴🏼🇮🇳📔🗣️💥


        (महाराष्ट्रातील समाजसुधारक,      
    स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)

मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे

   जन्म : ३० एप्रिल, १९०९
      (यावली, जि. अमरावती)
   निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८
       (मोझरी, जि. अमरावती)
गुरू : आडकोजी महाराज
भाषा : मराठी, हिंदी
साहित्यरचना : ग्रामगीता, 
                     अनुभव सागर 
                      भजनावली,   
                      सेवास्वधर्म, 
                      राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 
           जातिभेद निर्मूलन
वडील : बंडोजी
आई : मंजुळाबाई
             तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
        भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
          अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.
                    सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
           महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
               देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
                   ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
                   तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.

               ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

📒 साहित्य संमेलने :-
             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
 
📚 पुस्तके :-
            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)
राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
लहरकी बरखा (हिंदी)
सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

📙 ग्रामगीता :- 
       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

        संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-

         हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥
       
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
        स्त्रोत ~  WikipediA                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
महाराष्ट्र करू स्मार्ट📡📲

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

पांगुळगाडा - लेखक श्री वासुदेव पाटील (संग्राहक : श्री अविनाश पाटील)

पांगुळगाडा

          🔖 भाग::-- तिसरा

     ✒️  वा......पा.............
   गिरधन आबाची नात गेल्यानं श्रीराम पेंटरनं मंदीर रंगवण्याचं काम पाच दिवस बंद ठेवत दुसऱ्या गावाची कामं उरकली‌. गयभू, लिला, आबा  तर सुन्न होतेच पण सोबत दोन्ही मोरबीतलं वातावरणही सुन्न. जो तो आपापल्या लहान मुलांना जपू लागला. डोळ्यात तेल घालत मुलांच्या पाळतीवर राहू लागला. रात्री केव्हाही उठत मुलं जागेवर आहेत याची खात्री करु लागला. जरा कुठं  खुट्ट झालं की काळजात धस्स होऊ लागलं. आता पर्यंत जी तापी माय मायेच्या मायेनं पालनपोषण करत आली त्याच तापी मायकडं जो तो साशंकतेनं पाहू लागला. काठाकडं जायला घाबरू लागला. गावातली तरणीबांड पोरं रात्रीची गस्त सुरू करण्याची प्लॅनिंग करु लागले.

    पाचव्या दिवशी वायकरांनी श्रीराम पेंटरला पोलीस स्टेशनला बोलवलं. त्यांना माहीत होतं की आपण जे करतोय त्याला कायद्याचा आधार नाही. तरी तूर्तास दुसरा मार्गच सापडत नव्हता.

" श्रीराम! आज रात्री पासून मंदीर रंगवायचं काम सुरू कर!"

" साहेब मंदीराचे अध्यक्ष - गिरधर आबाकडं दु:खाचा प्रसंग गुदरला म्हणून ते काम बंद ठेवलय!"

" आबांनी स्वत: काम बंद करायला सांगितलं का?"

" आबा तसं बोलले नाही पण ..."

" मग उद्याच कामाला सुरूवात कर! पण त्या आधी दिवसा आमच्या पोलीस स्टेशनची रंगरंगोटी कर नी रात्री मंदीराचं काम कर"

ततफफ करत श्रीरामनं होकार दिला व परतत कामास सुरुवात केली. त्यानं दिवसभर पोलीस स्टेशनात पेंटीग केली. कदमनं साहेबांनी सांगितल्याप्रमाणं लक्ष घालत दिवसभर त्याला अजिबात विश्रांती घेऊ दिली नाही. रात्री जेवणानंतर लगेच कदमांनी त्याला मंदीराच्या कामावर पाठवलं. श्रीराम पेंटर वाल कंपाऊड ची मधली बाजू चितारू लागला. कुठं विठ्ठलाची, शंकराची आरती लिही, कुठं शिवमहिमा चितार,  कुठं  संताची चित्रे काढ, नामा, तुकोबाराय, माऊली चितार, असं करत करत रात्रीच्या दोन पावेतो तो मोरबीकडच्या गेटपर्यंत आला. वायकरांनी कदमांना मंदीरातच आजूबाजूला दूर थांबायला लावत  त्याला झोपू न द्यायला लावलं होतं. दोनच्या सुमारास पेट्रोलींग करत वायकर ही मंदीरात आले. श्रीराम पेंटरच्या डोळ्यात आता गुंगी येऊ लागली. त्यानं गेटजवळची मधली बाजूच चितारायला घेतली. बिलकुल विरुद्ध बाजूस बाहेर मधलं दृश्य चितारलं होतं. आता मधल्या बाजूस बाहेरचं दिसणारं दृश्य चितारण्याचं त्यानं ठरवलं. समोर लहान मोरबीकडून उतरणारी उतरण तो उतारू ( चितारू)  लागला. वायकर व कदम विठ्ठल मंदीराच्या सभामंडपातल्या खिडकीतून त्याकडं पाहत होते. चितारता चितारता पेंटर नं जांभई देत ब्रश खाली ठेवला. थोडं मागे सरकत ताणलेल्या व शिणलेल्या अंगाला आळोखे पिळोखे दिले. तरी डोळ्यात आता झोप उतरत झापडं जडावली. तो ब्रश घेत वरची दिसणारी घरं, दबलेली व मागंपुढं सरकलेली धाबी, मावठी, पक्क्या हवेलीच्या तिरकस भिंती, मनोरे चितारु लागला. आता झोप पूर्ण घेरू लागली. एक झपकी घ्यावी म्हणून तो ब्रश ठेवणार तोच खाडकन पुन्हा डोळे उघडत त्याचे हात आपोआप सरावानं सपासप चालू लागले. झोप, जाग, संवेदन, जाणिव की नेणीव... आपण झोपतोय.... आपण चितारतोय ! काय नेमकं काय? रंगात ब्रश की  मनाच्या नेणीवेत जाग? की जाणिवेत झोप? ब्रशचे फर्ऱ्हाटे सुरुच, डुलकी सुरुच. तो तसाच जागेवर कलला.

    वायकर मंदीरातून हळूच पुढे आले. त्यांनी लहान मोरबीच्या उताराच्या वाटेवर केव्हाची रोखून धरलेली नजर चित्रावर रोखली! त्यांचा अंदाज खरा ठरला होता. तरी ते अचंबीत झाले. चित्रात गेटमधून दिसणारं मोरबीचं दृश्य चपखल चितारलं असलं तरी उतारावरुन  पांगुळगाडा ढकलत उतरणारी गिरधर आबाची नात बाली  कशी? बालीला जाऊन सहा दिवस झालेले. श्रीराम चित्र काढत होता तेव्हा वायकरची नजर उतारावरच होती. तेव्हा त्यांना उतारावर ना पांगुळगाडा दिसला ना बाली! मग श्रीरामनं त्या दिवसा सारखाच आजही पांगुळगाडा का चितारला!वायकरनं कदमकडं पाहिलं. कदम तर विस्फारल्या डोळ्यांनी  पाहतच होता.
       वायकरनं श्रीरामला हलवत उठवलं.

" श्रीराम! सुंदर चित्र रेखाटलं तू! "

श्रीरामची नजर चित्रावर स्थिरावली. तो चमकला.

" साहेब! आजही तशीच चूक झाली झोपेत."

तो ब्रश रंगात बुडवत बाली व पांगुळगाड्यावर मारू लागला.

" थांब श्रीराम! आधी हा झोल नेमका काय? त्या दिवशी ही झोपेत तू पांगुळगाडाच चितारला अन आजही पांगुळगाडाच! सोबत आबांची पाच - सहा दिवसांपूर्वी मेलेली नात? जागतेपणी चितारता येणार नाही ते तू झोपेत कसं चितारु शकतो! श्रीराम सत्य काय ते सांग नाही तर पट्ट्या- लाथेनं बुकलत अंदर टाकतो! दोन निष्पाप मुलांचा जीव गेलाय!"

" साहेब! झोपेत चित्रे चितारले गेलेत हे आपणास खोटं वाटत असलं तरी ते‌च सत्य आहे! भले आपण मला तुडवलं, फासावर लटकवलं तरी तेच सत्य आहे!"

 " श्रीराम! यात काही तरी पाणी मुरतंय ! पटकन सांगून मोकळा हो!"

श्रीरामनं तोच नन्नाचा  पाढा लावला.

" कदम याला झोपूच नको देऊ! झोपला तरी चित्र काढणं सुरुच ठेवा!"

   सकाळी वायकर एकदम संभ्रमात पडले. पेंटर झोपल्यावर चित्र काढूच कसा शकतो? तेही तोच पांगुळगाडा, तीच मुलगी? पांगुळगाड्याचा काय संबंध!"

  श्रीराम पेंटर दिवसा पोलीस स्टेशन रंगवू लागला. दुपारी जेमतेम एक दोन तास त्याला झोपू दिलं.
    
    वायकरांना पांगुळगाडा डोळ्याभोवती गरगर फिरु लागला. त्यांनी शेवटी बारकू बोरसास स्टेशनात आणलंच. संशयीत म्हणून एकदा तपासायला काय हरकत आहे ? असा विचार करत त्यांनी बारकूस घेतलं. श्रीराम पेंटरनं पेंटींग करतांना  बारकू बोरसास आत येतांना पाहिलं. त्यांच्या अर्धवट झोपेनं बहिरट झालेल्या मेंदूत हे कुठं तरी कोरलं गेलं.

तिशी पस्तीशीतला बारकू बोरसे अंगानं भरलेला गोरापान व कामानं शरीर पिळदार बनवलेला गडी! तरी ठाण्यावर येताच आतून पुरता घाबरलेला.

   " बोरसे! गाव कोणतं तुझं?"

" पांघण! देवाचं पांघण साहेब! इथून चाळीस किमी अंतरावर तापीकाठावरच वसलंय!"

" गाव सोडून मोरबीत कसा आलास?"

" गावात धंदा म्हणावा तसा चालत नव्हता साहेब! मग नवीन गाव शोधता शोधता याच गावात आलो!"

"  धंदाच करतो की इतर धंदे ही करतो?"

" साहेब!.... म्हणजे...?"

" उलट सवाल नको! जे विचारलं ते सांग मुकाट्यानं!"

" नाही साहेब. फक्त लाकुडकाम!" बारकू खाली मान घालत बोलला.

" गावात काय घडतंय माहीत आहे का तुला!"

"........"

" बोरसे, मी काय विचारतोय?"

" हो साहेब! तात्यांचा नातू गायब झालाय तर आबांची नात....."

" दोघा मुलांच्या घटनेस्थळी पांगुळगाडा सापडलाय!  कदम! आणा ते दोन्ही पांगुळगाडे!"  वायकरनं जोरात कदमला आरोळी ठोकली.

 कदमनं दोन्ही पांगुळगाडे आणले. श्रीराम पेंटर ब्रश चालवत तिरकी नजर मध्ये टाकत होता. बोरसा समोर पांगुळगाडे पडलेत. ही जाणीव ही त्याच्या मेदूत कोरली.

" बोरसे! तूच बनवलेत ना हे?”

" हो साहेब!"

" किती पांगुळगाडे बनवलेत तू? कुणाकुणाकडे दिलेत तू?"

" साहेब! या गावात एवढे नाही. तीन बनवलेत!"

" तुझ्या गावाला ही बनवत आला असशील तू? तिथं ही काही घटना?"

" बनवलेत साहेब!"

" काही विचीत्र अनुभव, घटना?"

" नाही साहेब"

" इथं तिसरा पांगुळगाडा कुणाकडं दिलाय? केव्हा?"

" गयभू घेऊन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशीच नानजी पाटलाकडं"

वायकर चपापले.

" नानजी पाटील मोठ्या मोरबीतले का?”

" होय साहेब!"

नंतर वायकरने त्यास 'बोलवलं की सरळ ठाण्यात यायचं' सांगत  जाऊ दिलं.

" कदम ! आपला तपास हा वाऱ्यावरच्या लाथा तर नाहीत ना?
वायकरनं कदमालाच विचारलं. पण कदमच्या मनातही तेच विचार घोळत होते. हा  पेंटर भंगोड्या असावा. याच्या नादी लागून साहेब तपासाची दिशा भरकटत नेत आहेत व वेळ ही वाया घालवत आहेत.

     वायकरनं नानजी पाटलाकडं जात घरात लहान मूलं किती याबाबत‌ चौकशी करत मुलांच्या काळजी घेण्यांचा सुचक सल्लाही दिला.

 रात्री श्रीराम पेंटर ला पुन्हा मंदीराचं राहिलेलं काम करण्यासाठी पाठवलं. आता रात्री तो मंदीराची पुर्वेकडील भिंत आतून  चितारणार होता. मंदीराच्या समोरील या भागात पटांगण होतं. या भिंतीला तापीकाठाकडं जाण्यासाठी  महादेव मंदीराच्या समोर तिरकस गेट होतं. त्याच गेटमधून तात्यांचा नातू बाहेर पडला असावा. 
  पेंटरनं त्या भिंतीवर मधल्या बाजूस संत व त्यांचा जिवनपट चितारावयास सुरुवात केली. संतसेना, माती तुडवणारे गोरोबा, मळ्यात राबणारे सावता माळी ,संत नरहरी सोनार असे एक एक संत चितारता चितारत पहाटे तीन वाजायला तो काठाकडं जाणाऱ्या गेटजवळ आला. तेथे तो समोर दिसणारा तापीकाठ , संथ तापीमाय काढणार होता. पण विविध समाजाचे संत चितारता चितारता झोपेच्या गुंगीत समाज, समाजातील विविध व्यवसाय ही कल्पना त्याच्या सुप्त मनात साकारली जाऊ लागली. गोरोबा साकारतांना त्याला आपल्या मोरबीतला कुंभार आठवला, सावता माळी काढतांना गावातले भाजीपाला पिकवणारे माळी आठवू लागले. मग तंद्रीत गावातले सर्व व्यावसायिक आठवत राहिले. झोप दाटू लागली. गुंगी चढू लागली. गेटजवळ तापीकाठ, सौंदळची झाडं ...समोर दिसणारं  जे तो कायम पाहत आलेला होता ते चित्रात उतरु लागलं. पुन्हा झोप, जाग, जाणिवा- नेणिवा, मनाचे खेळ, मनातल्या प्रांतात चालणारे व्यवहार ....सारं सारं खुलं होऊ लागलं. तो चित्र चितारता चितारताच कलला. 

मंदिराच्या संभामंडपात बसून बसून डुलकी देणारे वायकर खडबडून उठले. ते चित्राजवळ आले. आता तर ते जागेवर हबकून अक्षरश: उडालेच.
गेटजवळचं मधल्या भागातून समोर दिसणारं दृश्य श्रीरामनं चितारलं होतं.
 मंदीरापासून पसरलेला तापीकाठ....खोरं...सौंदळची झाडं...एका सौंदळच्या झाडाजवळ पांगुळगाडा ठेवत काठाकडं हात वर करत- जणू कुणाचा तरी हात धरत दुडूदुडू चालत असल्यासारखा मुलगा! पण सोबत दोन्ही बाजूला कोण  चालतंय हे दिसत नव्हतं. मोरबीच्या गेटकडच्या दिशेनं असाच एक पांगुळगाडा मुलगी तापीपात्राकडं ढकलत नेत होती. तसाच तिसरा पांगुळगाडा मोठ्या मोरबीकडून येतांना दिसत होता पण त्याच्याजवळ मूल दिसत नव्हतं. आणि.....आणि....तापी पात्राजवळ बोरसाचं वासलं, किकरं, कुऱ्हाड, रंधा, करवत, लाकडं पडलेली. बोरसा खाली मान घालत किंचीत वर डोळे करत  मुलांकडं पाहत पांगुळगाडा बनवत होता. अप्रतिम, जिवंत चित्र साकारलेलं. वायकर पाहून थक्क झाले.

 " साहेब हा पेंटर भांग खाऊन काम करतो वाटतं. दिवसा जे पाहतो तेच नशेत चितारतो! याच्या नादी आपला तपास भरकटतोय! " कदम वायकर साहेबास सुचवत होता

 तोवर मोरबीतून पहाटे लोक यायला लागले. चार दोन लोकांनी चित्र पाहिलं.  वायकरनं श्रीरामला उठवलं.श्रीरामला खूण करताच श्रीरामनं ब्रश रंगात बुडवत सपासप चित्रावर फिरवत मिटवलं व तो पुन्हा तापीकाठ रंगवू लागला. पण आता समोर जे दिसायचं तेच साकारू लागलं.

   वायकरनं सकाळी नऊ वाजताच बारकू बोरसाच्या पेकाटात बुटासहीत लाथ घालत गाडीत बसवत ठाण्यात आणलं. ठाण्यात येताच पुन्हा दोन तीन लाथा घातल्या. बोरकू बोरसाच्या ओठात दात घुसत रक्त वाहत होतं. ते पुसत तो गयावया करत होता.

"बारकू शेठ! जरा ही रंधा इकडं तिकडं न चालवता गुण्यात लाकुड तासत धारकोर तासतो तसंचं सरळ सरळ सारं खरं खरं ओक!" वायकर लालेलाल होत फुत्कारत होते.

" साहेब! सारं सारं सांगतो! पण विश्वास ठेवा मी मुलांना काहीही केलं नाही! "

.
.
.
 क्रमश:......

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...