शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

धनत्रयोदशी


  🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
       धनतेरस किंवा धनत्रयोदशी


 अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
       

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

दिवाळीचा पहिला दिवस - वसूबारस

   🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
           🐄 वसुबारस 🐄


        आज रमा एकादशी आहे आणि वसुबारस पण आहे.वसुबारस या सणापासूनच दीपावली पर्वाला प्रारंभ होतो,असे दांते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
        वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरी केली जाते. घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.
          वसुबारस दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
       या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
     वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गंमतशीर माहिती अशी सांगितली जाते की, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून १०० कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशी ही आपली गौमाताचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभु प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी उपासना केली जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलक - श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
                                                                  
     ➿➿➿➿➿➿➿➿➿

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

        

(महाराष्ट्रातील समाजसुधारक,      
    स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)

मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे

   जन्म : ३० एप्रिल, १९०९
      (यावली, जि. अमरावती)
   निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८
       (मोझरी, जि. अमरावती)
गुरू : आडकोजी महाराज
भाषा : मराठी, हिंदी
साहित्यरचना : ग्रामगीता, 
                     अनुभव सागर 
                      भजनावली,   
                      सेवास्वधर्म, 
                      राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 
           जातिभेद निर्मूलन
वडील : बंडोजी
आई : मंजुळाबाई
             तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
        भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
          अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.
                    सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
           महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
               देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
                   ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
                   तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.

               ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

📒 साहित्य संमेलने
             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
 
📚 पुस्तके
            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)
राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
लहरकी बरखा (हिंदी)
सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

📙 ग्रामगीता
       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

        संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-
           हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥
       
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 विनम्र अभिवादन 🙏
           ♾♾♾  ♾♾♾
      स्त्रोत ~  WikipediA 

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

हिंदी दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शन

हिंदी दिनानिमित्त बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयात हिंदी साहित्यिकांच्या जीवनावर 'पोस्टर प्रदर्शनाचे' आयोजन...

लहान गटातून उमेश्वरी पारधी तर मोठ्या गटातून प्राची सोनवणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक...

धुळे दि. १४ 

१४ सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवसाचे औचित्य साधून शहरातील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक मा. श्री आर. एन. पाटील, पाॅलीटेक्नीक विभागाचे प्राचार्य श्री झेड. एफ. पिंजारी, प्राचार्य श्री पी. बी. पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार उपस्थित होते.
हिंदी विषय शिक्षक श्री ए. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने हिंदी साहित्यिकांची यादी तयार केली. तद्नंतर त्यांना गुगल च्या मदतीने हिंदी कवी, लेखक, नाटककार, कहानीकार यांची माहीती शोधून लिहून आणायला सांगीतली. त्यावर आधारीत विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार केले. यामध्ये शाळेच्या इ. ५ वी ते १० वी तील एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार व कहानीकार यांची माहीती झाली त्यांचा जीवनपरीचय व कार्य त्यांना समजले. भविष्यात त्यांनी या साहित्यिकांचे साहित्य वाचनाचे आश्वासीत केले. 
हिंदी विषय समितीचे प्रमूख श्री ए. के. पाटील, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर व श्री डी. डी. पवार यांनी यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले.

यामध्ये इ. ५ वी ते ७ वी च्या गटातून प्रथम क्रमांक कु. उमेश्वरी पारधी, द्वितीय - राज बुधा पवार तर तृतीय क्रमांक कु. किर्ती दिनेश गवळी या विद्यार्थीनीने पटकावला. मोठ्या गटातून (इ. ८ ते १० वी) प्रथम - प्राची सुनिल सोनवणे, द्वितीय भारत अशोक जाधव तर तृतीय क्रमांक कु. निशा छोटू अहिरे या विद्यार्थ्यांनी पटकावला. यावेळी परिक्षक म्हणून पाॅलीटेक्नीक विभागाच्या प्रा. पुनम निकूमे, प्रा. विजया मराठे, प्रा. वर्षा देवरे यांनी कामगिरी बजावली. कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री विजय देसले, श्री एस. बी. भदाणे, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री कुणाल साळुंके, श्री जयेश गाळणकर, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे यशस्वी पणे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन व कौतूक केले.

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

कोंडाजी फर्जंद

        🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                ▬ ❚❂❚❂❚ ▬          

संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                               
      🚩🤺🏇🚩👳‍♀🚩🏇🤺🚩

               कोंडाजी फर्जंद 

बेखौफ छत्रपतींचा दिलफेक योद्धा...!

सन १६८१ , स्वराज्याचा दुसरा छत्रपती संभाजीराजा सिंहासनाधिष्ट होत नाही तोच हंबीररावांनी बुरहानपूर मारले. ती तारीख होती ३० जानेवारी १६८१
आणि सोबतच राजांनी सिद्दीची कुंडली हाती घेतली होती. उंदेरीच्या जलकोटावर एक जबरदस्त हल्ला चढवला होता. पण एवढ्यातच एक वार्ता उठली.
"कोंडाजी दुष्मनास सामिल झाला" दगाबाज झाला" स्वराज्याची निष्ठा सोडून गनिमाच्या- सिद्दीच्या चाकरीत दाखल झाला !

बुलंद दुर्गास अगदि आतूनच सुरूंग लागावा तशी ही घटना.
शिवकाळातच कोंडाजी हा नाव मिळवून होता. पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापूरकर इंग्रज काही तोफा घेऊन पैशाच्या अमिषाने सिद्दी जोहरच्या वेढ्यात सामिल झाले होते.
यावेळी कोंडाजीने मोठ्या बेमालूमपणे इंग्रजांचा वेश धारण करून सिद्दी जोहरच्या तोफा निकामी केल्या होत्या. पुढे पन्हाळगड जिंकण्यास त्याने प्राणाची बाजी लावून अवघ्या ६० मावळ्यांसह पन्हाळगड एका रात्रीत सर केला होता. असा हा वीर !
सिद्दीचे आश्रयस्थान ते जंजीरा. तसे जलदुर्ग कुठलाही असो तो पाण्याने सुरक्षित असतोच. शिवाय त्याजवळ पोचण्याच्या प्रयत्नात असलेल गलबत मोठ्या सहजतेने त्या जल दुर्गावरील तोफांच्या भक्षस्थानी पडत असे. अशाप्रकारे प्रत्येकच जलदुर्ग हा अभेद्य ठरत असे.
म्हणूनच सन १६८२ मध्ये, सिद्दीला त्याच्या वारूळातच गाठून माराव असे योजून संभाजीराजांनी सिद्दीकडून जंजिरा जिंकण्यासाठी एका कूटनितीचा अवलंब केला. आणि यासाठी निवड करण्यात आली ती कोंडाजी फर्जंद या योद्ध्याची !
ठरल्या मसलती प्रमाणे कोंडाजीं राजांची चाकरी सोडून सिद्दीस सामील झाला होता. सिद्द्यानेही या योद्ध्याचे मोठे आगत स्वागत केले.
एवढेच नाहीतर सिद्दीच्या ऐषारामी- रंगेल रंगात बेमालूमपणे रंगून कोंडाजीने एक बटीकही खरेदी केली. मात्र खोल काळजाच्या त्या कप्प्यात स्वराज्याचा मानस शाबूत होता. अभेद्य जंजीऱ्याच्या दारूकोठारास आग लाऊन तो भस्म करण्याचा तो बेत त्याच्या बुद्धीत आकारास येऊ लागला होता. सापाच्या वारूळात शिरून ते उध्वस्त करण्याचा हा बेत म्हणजे प्राणचीच बाजी. 

जंजीऱ्याच्या महालात कोंडाजी आपल्या सहकाऱ्यांसह राहू लागले. सिद्दीच्या गळ्यातील ताईत झाले.
आणि एका ठरल्या दिवशी किल्ल्यामधील दारू कोठारास आग लावून एकच भडका उडवून द्यायचा तो बेत आता पूर्णत्वास जावयास आतूर होता. कोंडाजीचे सहकारी कामाला लागले. दूर रायगडाच्या दरबारी मुजरे स्विकारीत असलेला राजाही मधूनच हरवून सागर दिशेने नजर लावून बघत होता.
आता कोंडाजीही सहकाऱ्यांसह सिद्द झाला होता. आणि विश्वासाधिन असलेल्या आपल्या त्या बटिकेस त्यांनी तो बेत सांगीतला. तेव्हा तिनेही सोबत येण्याची तयारी चालवली. मात्र तिच्या या घाईची कहानी तिच्या दासीला समजली. आणि तिने थेट सिद्दीला गाठले, आणि अचानक घातच झाला..!
ती दासी काझी महमद तालकर याची स्त्री होती. तिच्याकरवीच सिद्दीस सर्व माहिती मिळाली व लगेच त्याने कोंडाजी आणि मंडळीस कैद करण्याचा हबश्यांना हुकूम दिला. कोंडाजीसह साऱ्यांची धरपकड झाली.
सिद्दी तसा क्रूरकर्माच ! त्याने लगेच हुकुम फर्मावला आणि …कोंडाजींचा शिरच्छेद करण्यात आला. सोबतींपैकी काहींना जल समाधी देण्यात आली तर धांदलात कुणी पळोन गेले. तटावरून उडी मारून खडकावर आदळून जाया झाले. स्वराज्याच्या आसमंतातील एक तारा निखळला होता... स्वराज्याच्या दुर्गाचा बुलंद बुरूजच ढासळला होता.
कोंडाजींचे वर्तमान संभाजीराजांना कळताच त्यांनी पुढचे एक धाडसी पाउल उचलले. एवढ्या दिवसापासून रचलेला एक धाडसी प्रयत्न फसला होता, आता मोहिमेची सूत्रे संभाजीराजांनी आपल्या हातात घेऊन जंजीऱ्याच्या दिशेने कूच केले.
संभाजीराजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून सिद्दीला जेर केले. या संबधी मुंबईकरांनी सुरातकरांना १९ जाने १६८२ रोजी पत्र पाठवलेले उपलब्ध आहे त्या मधील नोंदीनुसार –
‘सिद्दी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तो पर्यंत संभाजीस शांतता मिळणार नाही असा त्याने निग्रह केला आहे’.
काही केल्या किल्ल्यात प्रवेश करणे जरुरीचे होते, किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ शकत नव्हती, जंजि-या भोवती सिद्दिचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार यामुळे काही प्रवेश करणे शक्य नव्हते, म्हणून संभाजी राजांनी आता सिद्दीस जेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा निर्णय घेतला! हे म्हणजे कल्पनेपलीकडचे होते, इतिहासामधूनच इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंका प्रवेश केला तसेच थेट खाडी बुजवून सेतू बांधून जंजिरा सर करण्याचा संभाजीराजांचा मानस होता. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले. लाकडाचे ओंडके, आवश्यक तेवढी साधन सामग्री मागवण्यात आली. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हा एक मोठा प्रश्नच होता, पण या कडे एक धाडसी निर्णय म्हणून पाहता येईल. सेतू बांधण्यात थोडे यश प्राप्त झाले खरे पण निसर्गचक्रापुढे कोणाचे काय चालणार ? सागरास भारती आली आणि केल्या कामावर पाणी फेरले गेले.
याच दरम्यान खासा औरंगजेब संपूर्ण ताकदीने दख्खनेत उतरला होता. फेब्रु १६८२ च्या सुमारास त्याने बुरहाणपूर सोडले. त्याच वेळी औरंगजेबाचा सरदार हसन अली याने आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आणि कल्याण भिवंडी जाळून भस्म केले याची नोंद जेधे शकावली मधे मिळते – ‘शके १६०३ माघमासी हसनअली कल्याण भिवंडी जाळोन फिरोन गेला.
औरंगजेब दख्खनेत उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडणे क्रमप्राप्त झाले. खासा दिल्लीपतीच महाराष्ट्रात आल्यामुळे संभाजीराजांसमोर मोठे आव्हान समोर उभे होते, त्यामुळे दादाजी रघुनाथ यांच्याकडे मोहिमेची सूत्रे देऊन संभाजीराजे खानाच्या समाचारास परतले ! असा हा धाडसी राजा व असे त्याचे धाडसी योद्धे ! पण संभाजीराजांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्यात कोंडाजी फर्जंद हा प्रथमवीर ठरला ! 
आज मात्र या जंजिऱ्यात जो इतिहास सांगितला जातो त्यात या महावीराचे नाव कुठेच घेतले जात नाही.  जंजिरा अजिंक्य म्हणून फुशारकी मारणारे सिद्यायचे वंशज खोटा इतिहास सांगत फिरतात. 
मात्र आजही जाऊन जंजीऱ्याच्या त्या अभेद्य तटबंदीच्या पाषाणास विचारा-
ते ही सांगतील की,
आम्ही उरलो ते सिद्दीची जुल्मी सत्ता सांगावयास वा पिडित रयतेचे हाल बोलावयास नव्हे !!!
तर उरलो आम्ही तुम्हा सांगावयास बेखौफ उमद्या छत्रपतीची चाल तूफानी व तयासाठी जान कुर्बान करणाऱ्या दिलफेक योद्ध्याची ही अमर काहानी !
कारण उरात दडलेल्या या शौर्य कथा, थंड पाण्यातील ज्वलंत व्यथा, ज्या सागराशी झुंजावयाचे धाडस 
आजही देतात आम्हांस , सदैवच !!!

     🚩 हर हर महादेव...!🚩

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
     
       स्त्रोत ~ WikipediA                                       

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

जागतिक आदिवासी दिन


       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳 

संकलन - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                           
      जागतिक आदिवासी दिन


     आदिवासी दिन- 9 ऑगस्ट

पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करुन गेला आणि नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासात नंतर शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली असली तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रुढी- परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरुन आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रुढी परंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसते.

जगात समाज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती, साम्राज्यवाद आणि त्यानंतर युद्ध असाही प्रवास झाला. 19 व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या महायुद्धांमध्ये प्रचंड असा विध्वंस झाला. त्यानंतरच्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य, अधिकार, मैत्री, समन्वय यांना प्रथमच मान्यता दिली. त्याचा परिपाक म्हणून 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला.

संयुक्त राष्ट्रात लहान मोठे असे जगभरातील देश ज्यांची एकूण संख्या 192 इतकी आहे, ते एकत्र आले. सीमांचे प्रश्न, आरोग्य समस्या, विश्व वारसा याबाबत सकारात्मक बदल संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठातून जगासमोर आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल 50 वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली.

जागतिक स्तरावर या हालचाली खूप विलंबाने झाल्या असल्या तरी भारतात मात्र देश स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका ठेवून तरतूद करण्यात आली होती. संविधानामध्ये एकूण 22 भाग, 12 अनुसूची व 395 अनुच्छेद आहेत. यामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी आहेत. अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मुख्य अनुच्छेदामध्ये तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.

• अनुच्छेद 366 मध्ये अनुसूचित जमातीची परिभाषा नमूद केलेली आहे.

• अनुच्छेद 342 मध्ये संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यात राहत असलेल्या अनुसूचित जमातीची यादी घोषित करण्यात आली आहे.

• अनुच्छेद 341 (1)मध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीच्या प्रशासनासंबंधी व त्याचे नियंत्रण यासंबंधी तरतुदी आहेत.

• अनुच्छेद 244 (1) 5 मध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी लागू असलेल्या कायद्यासंबंधी स्पष्ट तरतूदी आहेत. अर्थात भूमि अधिग्रहण व हस्तांतरण, बँकीग व्यवस्था, प्रशासन व्यवस्था इत्यादी प्रशासकीय बाबी गैर आदिवासी क्षेत्राव्यतिरिक्त आहेत.

• अनुच्छेद 244 (1) अंतर्गत 73 व्या घटना दुरुस्तीद्वारे पाचवी अनुसूची अंतर्गत भारताच्या महामहीम राष्ट्रपतींनी आदिवासींची सांस्कृतिक सामाजिक स्वायत्तता जतन करणारा पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) दिनांक 24 डिसेंबर 1996 रोजी जारी करुन अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना स्वयंशासनाचा अधिकार बहाल केला आहे. शासकीय यंत्रणा, निर्वाचित सदस्य आणि आदिवासी यांच्या सहयोगाने या कायद्याच्या अंमलबजावणीतून आदिवासींच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल होऊ शकतो.

आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती. इंग्रजाच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेसा कायद्याने आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा परंपरा याचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे आहे. पेसा कायदा महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांना लागू होतो. पेसा कायद्यांतर्गत सामाजिक हित, रुढी परंपरा, प्रथा व सांस्कृतिक ओळख यांचे जतन व संवर्धन करण्यास, तसेच सामुहिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यास आणि आपआपसातील तंटे मिटविण्यास ग्रामसभा सक्षम आहे. यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात परंतु निम्म्यापेक्षा कमी नाही इतके पंचायत राज संस्थामध्ये लोकप्रतिनिधी पदाचे आरक्षण यामध्ये सरपंच पदाचे आरक्षणसुद्धा अंतर्भूत आहे.

जमीन हस्तांतरणावर निर्बंध, भूमी संपादन व पुनर्वसन, कृषी/गौण वन उपज, लघु जलसाठे, गौण खनिजे, सावकारी परवाना, बाजार व्यवस्थापन, गावाचा विकास व आर्थिक व्यवस्थापन, अंमली पदार्थांचे नियमन, इत्यादी तरतूदी पेसा कायद्यात अंतर्भूत असून ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहेत.

अनुच्छेद 14 मध्ये समानतेचे अधिकार आदिवासींना दिलेले आहेत. आदिवासींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी यामध्ये विशेष तरतूद आहे. यासाठी अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 लागू करण्यात आलेला आहे.

अनुच्छेद 16 (4) अनुसूचित जमातीसाठी शासकीय नोकरीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद आहे. अनुच्छेद 23 मध्ये मानवी व्यापार व जबरदस्ती काम करवून घेणे याविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी विशेष तरतूद आहे. अनुच्छेद 330 मध्ये विधानसभेत व 332 मध्ये लोकसभेत अनु.जमातीच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहूल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करुन हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. राज्यात गडचिरोली, नंदूरबार आणि पालघर हे जिल्हे मुख्यत्वेकरुन आदिवासी बहूल जिल्हे आहेत. या जिल्ह्यात भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींनी जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतीगृहे उपलब्ध करुन दिली जात आहेत. केवळ इतके करुन होत नाही तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करता यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणदेखील आता नव्याने सुरु झाले आहे.

याठिकाणी आदीम जमातींचा अधिवास अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळण-वळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे, यात माडिया -गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी-माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल. याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.

कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते. आदिवासींना ढाल करुन काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येवू नका असे छातीठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करुन इथं आता विकासवाटेवर वाटचाल सुरु झाली आहे, असेच या दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणता येईल.

                 
          
       स्त्रोत ~ WikipediA    
                                                                         ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

वर्ग प्रतिनिधी निवडणूक २०२३\२४

लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी घेतली ई - निवडणूक : 

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्गप्रतिनिधी निवडीसाठी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम :

शालेय विकासासाठी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी संपन्न :
धुळे दि. २८|७|२३



विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता विविध प्रात्यक्षिकांसह शिकविणे ही काळाची गरजच बनलेली आहे. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकवलेले चिरकाल स्मरणात राहते यासाठी आपली लोकशाही व त्यातील निवडणूक प्रक्रिया याची माहीती व्हावी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच विद्यार्थी प्रतिनिधींसाठी लोकशाही पद्धतीने ई - निवडणूक, अनोखी व नाविन्यपूर्ण मतदान प्रक्रिया संपन्न झाली.
या मतदानाचे विशेष म्हणजे ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला. 'वोटींग मशीन' या मोबाईल ॲपच्या सहाय्याने उमेदवार व त्यांचे चिन्ह यासमोरील बटन दाबून विद्यार्थ्यांनी मतदान केले. 
इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गांसाठी वर्ग प्रतिनिधी म्हणून एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरलेले होते. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य श्री प्रवीण पाटील सर यांच्याकडे सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उमेदवार म्हणून उमेदवारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सभा आयोजित करून त्यांना या मतदानासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्ग हा मतदार संघ असून त्या वर्गातील वर्ग प्रतिनिधींसाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक साहित्याचे चिन्ह वाटप करण्यात आले. आणि प्रचारासाठी सुद्धा त्यांना दोन दिवस देण्यात आले. त्यानंतर  इयत्ता पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहीती उपक्रम संयोजक श्री अविनाश पाटील यांनी दिली.

मतदानानंतर कु. किर्ती गवळी (इ. ५ वी), कु. खुशी कोळी (इ. ६ वी), कु. उमेश्वरी पारधी (इ. ७ वी). कु. श्रद्धा चव्हाण (इ. ८ वी), सुमित हिवरकर (इ. ९ वी), भाविका मोहीते (इ. १०), चेतन पाटील (इ. ११ वी) व प्रसाद पाटील (इ. १२ वी) यांनी बहुमत मिळवले. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नाचून जल्लोष साजरा केला. यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यापैकी त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, सहल मंत्री, अर्थ मंत्री, स्वच्छता मंत्री अशी विविध मंत्री पदे देऊन लगेच शपथविधीचा कार्यक्रम ही संपन्न झाला. यातून शालेय कामकाजामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार असून प्रशासकीय कामाची माहीती देखील मिळणार असून त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसीत होईल असा आत्मविश्वास प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते  मनोगतात म्हणाले की, "अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेतला तर नक्कीच त्यांना आपल्या लोकशाही प्रणालीतील बऱ्याचशा गोष्टीं स्पष्ट होतील. शालेय जीवनात समजून घेतलेल्या गोष्टींचा चिरकाल परिणाम होत असतो. म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेमध्ये अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी संधी देत असतो. आज पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिक देण्याची गरज आहे. त्यांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देणे महत्वाचे आहे."

उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री जयेश गाळणकर, श्री कुणाल साळूंके, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांचे सहकार्य लाभले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी अभिनंदन व कौतूक केले.

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...