बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
                                                                  
     ➿➿➿➿➿➿➿➿➿

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

        

(महाराष्ट्रातील समाजसुधारक,      
    स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)

मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे

   जन्म : ३० एप्रिल, १९०९
      (यावली, जि. अमरावती)
   निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८
       (मोझरी, जि. अमरावती)
गुरू : आडकोजी महाराज
भाषा : मराठी, हिंदी
साहित्यरचना : ग्रामगीता, 
                     अनुभव सागर 
                      भजनावली,   
                      सेवास्वधर्म, 
                      राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 
           जातिभेद निर्मूलन
वडील : बंडोजी
आई : मंजुळाबाई
             तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
        भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
          अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.
                    सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
           महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
               देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
                   ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
                   तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.

               ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

📒 साहित्य संमेलने
             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
 
📚 पुस्तके
            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)
राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
लहरकी बरखा (हिंदी)
सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

📙 ग्रामगीता
       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

        संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-
           हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥
       
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 विनम्र अभिवादन 🙏
           ♾♾♾  ♾♾♾
      स्त्रोत ~  WikipediA 

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

हिंदी दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शन

हिंदी दिनानिमित्त बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयात हिंदी साहित्यिकांच्या जीवनावर 'पोस्टर प्रदर्शनाचे' आयोजन...

लहान गटातून उमेश्वरी पारधी तर मोठ्या गटातून प्राची सोनवणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक...

धुळे दि. १४ 

१४ सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवसाचे औचित्य साधून शहरातील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक मा. श्री आर. एन. पाटील, पाॅलीटेक्नीक विभागाचे प्राचार्य श्री झेड. एफ. पिंजारी, प्राचार्य श्री पी. बी. पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार उपस्थित होते.
हिंदी विषय शिक्षक श्री ए. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने हिंदी साहित्यिकांची यादी तयार केली. तद्नंतर त्यांना गुगल च्या मदतीने हिंदी कवी, लेखक, नाटककार, कहानीकार यांची माहीती शोधून लिहून आणायला सांगीतली. त्यावर आधारीत विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार केले. यामध्ये शाळेच्या इ. ५ वी ते १० वी तील एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार व कहानीकार यांची माहीती झाली त्यांचा जीवनपरीचय व कार्य त्यांना समजले. भविष्यात त्यांनी या साहित्यिकांचे साहित्य वाचनाचे आश्वासीत केले. 
हिंदी विषय समितीचे प्रमूख श्री ए. के. पाटील, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर व श्री डी. डी. पवार यांनी यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले.

यामध्ये इ. ५ वी ते ७ वी च्या गटातून प्रथम क्रमांक कु. उमेश्वरी पारधी, द्वितीय - राज बुधा पवार तर तृतीय क्रमांक कु. किर्ती दिनेश गवळी या विद्यार्थीनीने पटकावला. मोठ्या गटातून (इ. ८ ते १० वी) प्रथम - प्राची सुनिल सोनवणे, द्वितीय भारत अशोक जाधव तर तृतीय क्रमांक कु. निशा छोटू अहिरे या विद्यार्थ्यांनी पटकावला. यावेळी परिक्षक म्हणून पाॅलीटेक्नीक विभागाच्या प्रा. पुनम निकूमे, प्रा. विजया मराठे, प्रा. वर्षा देवरे यांनी कामगिरी बजावली. कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री विजय देसले, श्री एस. बी. भदाणे, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री कुणाल साळुंके, श्री जयेश गाळणकर, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे यशस्वी पणे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन व कौतूक केले.

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

कोंडाजी फर्जंद

        🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                ▬ ❚❂❚❂❚ ▬          

संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                               
      🚩🤺🏇🚩👳‍♀🚩🏇🤺🚩

               कोंडाजी फर्जंद 

बेखौफ छत्रपतींचा दिलफेक योद्धा...!

सन १६८१ , स्वराज्याचा दुसरा छत्रपती संभाजीराजा सिंहासनाधिष्ट होत नाही तोच हंबीररावांनी बुरहानपूर मारले. ती तारीख होती ३० जानेवारी १६८१
आणि सोबतच राजांनी सिद्दीची कुंडली हाती घेतली होती. उंदेरीच्या जलकोटावर एक जबरदस्त हल्ला चढवला होता. पण एवढ्यातच एक वार्ता उठली.
"कोंडाजी दुष्मनास सामिल झाला" दगाबाज झाला" स्वराज्याची निष्ठा सोडून गनिमाच्या- सिद्दीच्या चाकरीत दाखल झाला !

बुलंद दुर्गास अगदि आतूनच सुरूंग लागावा तशी ही घटना.
शिवकाळातच कोंडाजी हा नाव मिळवून होता. पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापूरकर इंग्रज काही तोफा घेऊन पैशाच्या अमिषाने सिद्दी जोहरच्या वेढ्यात सामिल झाले होते.
यावेळी कोंडाजीने मोठ्या बेमालूमपणे इंग्रजांचा वेश धारण करून सिद्दी जोहरच्या तोफा निकामी केल्या होत्या. पुढे पन्हाळगड जिंकण्यास त्याने प्राणाची बाजी लावून अवघ्या ६० मावळ्यांसह पन्हाळगड एका रात्रीत सर केला होता. असा हा वीर !
सिद्दीचे आश्रयस्थान ते जंजीरा. तसे जलदुर्ग कुठलाही असो तो पाण्याने सुरक्षित असतोच. शिवाय त्याजवळ पोचण्याच्या प्रयत्नात असलेल गलबत मोठ्या सहजतेने त्या जल दुर्गावरील तोफांच्या भक्षस्थानी पडत असे. अशाप्रकारे प्रत्येकच जलदुर्ग हा अभेद्य ठरत असे.
म्हणूनच सन १६८२ मध्ये, सिद्दीला त्याच्या वारूळातच गाठून माराव असे योजून संभाजीराजांनी सिद्दीकडून जंजिरा जिंकण्यासाठी एका कूटनितीचा अवलंब केला. आणि यासाठी निवड करण्यात आली ती कोंडाजी फर्जंद या योद्ध्याची !
ठरल्या मसलती प्रमाणे कोंडाजीं राजांची चाकरी सोडून सिद्दीस सामील झाला होता. सिद्द्यानेही या योद्ध्याचे मोठे आगत स्वागत केले.
एवढेच नाहीतर सिद्दीच्या ऐषारामी- रंगेल रंगात बेमालूमपणे रंगून कोंडाजीने एक बटीकही खरेदी केली. मात्र खोल काळजाच्या त्या कप्प्यात स्वराज्याचा मानस शाबूत होता. अभेद्य जंजीऱ्याच्या दारूकोठारास आग लाऊन तो भस्म करण्याचा तो बेत त्याच्या बुद्धीत आकारास येऊ लागला होता. सापाच्या वारूळात शिरून ते उध्वस्त करण्याचा हा बेत म्हणजे प्राणचीच बाजी. 

जंजीऱ्याच्या महालात कोंडाजी आपल्या सहकाऱ्यांसह राहू लागले. सिद्दीच्या गळ्यातील ताईत झाले.
आणि एका ठरल्या दिवशी किल्ल्यामधील दारू कोठारास आग लावून एकच भडका उडवून द्यायचा तो बेत आता पूर्णत्वास जावयास आतूर होता. कोंडाजीचे सहकारी कामाला लागले. दूर रायगडाच्या दरबारी मुजरे स्विकारीत असलेला राजाही मधूनच हरवून सागर दिशेने नजर लावून बघत होता.
आता कोंडाजीही सहकाऱ्यांसह सिद्द झाला होता. आणि विश्वासाधिन असलेल्या आपल्या त्या बटिकेस त्यांनी तो बेत सांगीतला. तेव्हा तिनेही सोबत येण्याची तयारी चालवली. मात्र तिच्या या घाईची कहानी तिच्या दासीला समजली. आणि तिने थेट सिद्दीला गाठले, आणि अचानक घातच झाला..!
ती दासी काझी महमद तालकर याची स्त्री होती. तिच्याकरवीच सिद्दीस सर्व माहिती मिळाली व लगेच त्याने कोंडाजी आणि मंडळीस कैद करण्याचा हबश्यांना हुकूम दिला. कोंडाजीसह साऱ्यांची धरपकड झाली.
सिद्दी तसा क्रूरकर्माच ! त्याने लगेच हुकुम फर्मावला आणि …कोंडाजींचा शिरच्छेद करण्यात आला. सोबतींपैकी काहींना जल समाधी देण्यात आली तर धांदलात कुणी पळोन गेले. तटावरून उडी मारून खडकावर आदळून जाया झाले. स्वराज्याच्या आसमंतातील एक तारा निखळला होता... स्वराज्याच्या दुर्गाचा बुलंद बुरूजच ढासळला होता.
कोंडाजींचे वर्तमान संभाजीराजांना कळताच त्यांनी पुढचे एक धाडसी पाउल उचलले. एवढ्या दिवसापासून रचलेला एक धाडसी प्रयत्न फसला होता, आता मोहिमेची सूत्रे संभाजीराजांनी आपल्या हातात घेऊन जंजीऱ्याच्या दिशेने कूच केले.
संभाजीराजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून सिद्दीला जेर केले. या संबधी मुंबईकरांनी सुरातकरांना १९ जाने १६८२ रोजी पत्र पाठवलेले उपलब्ध आहे त्या मधील नोंदीनुसार –
‘सिद्दी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तो पर्यंत संभाजीस शांतता मिळणार नाही असा त्याने निग्रह केला आहे’.
काही केल्या किल्ल्यात प्रवेश करणे जरुरीचे होते, किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ शकत नव्हती, जंजि-या भोवती सिद्दिचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार यामुळे काही प्रवेश करणे शक्य नव्हते, म्हणून संभाजी राजांनी आता सिद्दीस जेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा निर्णय घेतला! हे म्हणजे कल्पनेपलीकडचे होते, इतिहासामधूनच इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंका प्रवेश केला तसेच थेट खाडी बुजवून सेतू बांधून जंजिरा सर करण्याचा संभाजीराजांचा मानस होता. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले. लाकडाचे ओंडके, आवश्यक तेवढी साधन सामग्री मागवण्यात आली. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हा एक मोठा प्रश्नच होता, पण या कडे एक धाडसी निर्णय म्हणून पाहता येईल. सेतू बांधण्यात थोडे यश प्राप्त झाले खरे पण निसर्गचक्रापुढे कोणाचे काय चालणार ? सागरास भारती आली आणि केल्या कामावर पाणी फेरले गेले.
याच दरम्यान खासा औरंगजेब संपूर्ण ताकदीने दख्खनेत उतरला होता. फेब्रु १६८२ च्या सुमारास त्याने बुरहाणपूर सोडले. त्याच वेळी औरंगजेबाचा सरदार हसन अली याने आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आणि कल्याण भिवंडी जाळून भस्म केले याची नोंद जेधे शकावली मधे मिळते – ‘शके १६०३ माघमासी हसनअली कल्याण भिवंडी जाळोन फिरोन गेला.
औरंगजेब दख्खनेत उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडणे क्रमप्राप्त झाले. खासा दिल्लीपतीच महाराष्ट्रात आल्यामुळे संभाजीराजांसमोर मोठे आव्हान समोर उभे होते, त्यामुळे दादाजी रघुनाथ यांच्याकडे मोहिमेची सूत्रे देऊन संभाजीराजे खानाच्या समाचारास परतले ! असा हा धाडसी राजा व असे त्याचे धाडसी योद्धे ! पण संभाजीराजांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्यात कोंडाजी फर्जंद हा प्रथमवीर ठरला ! 
आज मात्र या जंजिऱ्यात जो इतिहास सांगितला जातो त्यात या महावीराचे नाव कुठेच घेतले जात नाही.  जंजिरा अजिंक्य म्हणून फुशारकी मारणारे सिद्यायचे वंशज खोटा इतिहास सांगत फिरतात. 
मात्र आजही जाऊन जंजीऱ्याच्या त्या अभेद्य तटबंदीच्या पाषाणास विचारा-
ते ही सांगतील की,
आम्ही उरलो ते सिद्दीची जुल्मी सत्ता सांगावयास वा पिडित रयतेचे हाल बोलावयास नव्हे !!!
तर उरलो आम्ही तुम्हा सांगावयास बेखौफ उमद्या छत्रपतीची चाल तूफानी व तयासाठी जान कुर्बान करणाऱ्या दिलफेक योद्ध्याची ही अमर काहानी !
कारण उरात दडलेल्या या शौर्य कथा, थंड पाण्यातील ज्वलंत व्यथा, ज्या सागराशी झुंजावयाचे धाडस 
आजही देतात आम्हांस , सदैवच !!!

     🚩 हर हर महादेव...!🚩

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
     
       स्त्रोत ~ WikipediA                                       

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

जागतिक आदिवासी दिन


       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳 

संकलन - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                           
      जागतिक आदिवासी दिन


     आदिवासी दिन- 9 ऑगस्ट

पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करुन गेला आणि नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासात नंतर शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली असली तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रुढी- परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरुन आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रुढी परंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसते.

जगात समाज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती, साम्राज्यवाद आणि त्यानंतर युद्ध असाही प्रवास झाला. 19 व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या महायुद्धांमध्ये प्रचंड असा विध्वंस झाला. त्यानंतरच्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य, अधिकार, मैत्री, समन्वय यांना प्रथमच मान्यता दिली. त्याचा परिपाक म्हणून 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला.

संयुक्त राष्ट्रात लहान मोठे असे जगभरातील देश ज्यांची एकूण संख्या 192 इतकी आहे, ते एकत्र आले. सीमांचे प्रश्न, आरोग्य समस्या, विश्व वारसा याबाबत सकारात्मक बदल संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठातून जगासमोर आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल 50 वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली.

जागतिक स्तरावर या हालचाली खूप विलंबाने झाल्या असल्या तरी भारतात मात्र देश स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका ठेवून तरतूद करण्यात आली होती. संविधानामध्ये एकूण 22 भाग, 12 अनुसूची व 395 अनुच्छेद आहेत. यामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी आहेत. अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मुख्य अनुच्छेदामध्ये तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.

• अनुच्छेद 366 मध्ये अनुसूचित जमातीची परिभाषा नमूद केलेली आहे.

• अनुच्छेद 342 मध्ये संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यात राहत असलेल्या अनुसूचित जमातीची यादी घोषित करण्यात आली आहे.

• अनुच्छेद 341 (1)मध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीच्या प्रशासनासंबंधी व त्याचे नियंत्रण यासंबंधी तरतुदी आहेत.

• अनुच्छेद 244 (1) 5 मध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी लागू असलेल्या कायद्यासंबंधी स्पष्ट तरतूदी आहेत. अर्थात भूमि अधिग्रहण व हस्तांतरण, बँकीग व्यवस्था, प्रशासन व्यवस्था इत्यादी प्रशासकीय बाबी गैर आदिवासी क्षेत्राव्यतिरिक्त आहेत.

• अनुच्छेद 244 (1) अंतर्गत 73 व्या घटना दुरुस्तीद्वारे पाचवी अनुसूची अंतर्गत भारताच्या महामहीम राष्ट्रपतींनी आदिवासींची सांस्कृतिक सामाजिक स्वायत्तता जतन करणारा पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) दिनांक 24 डिसेंबर 1996 रोजी जारी करुन अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना स्वयंशासनाचा अधिकार बहाल केला आहे. शासकीय यंत्रणा, निर्वाचित सदस्य आणि आदिवासी यांच्या सहयोगाने या कायद्याच्या अंमलबजावणीतून आदिवासींच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल होऊ शकतो.

आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती. इंग्रजाच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेसा कायद्याने आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा परंपरा याचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे आहे. पेसा कायदा महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांना लागू होतो. पेसा कायद्यांतर्गत सामाजिक हित, रुढी परंपरा, प्रथा व सांस्कृतिक ओळख यांचे जतन व संवर्धन करण्यास, तसेच सामुहिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यास आणि आपआपसातील तंटे मिटविण्यास ग्रामसभा सक्षम आहे. यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात परंतु निम्म्यापेक्षा कमी नाही इतके पंचायत राज संस्थामध्ये लोकप्रतिनिधी पदाचे आरक्षण यामध्ये सरपंच पदाचे आरक्षणसुद्धा अंतर्भूत आहे.

जमीन हस्तांतरणावर निर्बंध, भूमी संपादन व पुनर्वसन, कृषी/गौण वन उपज, लघु जलसाठे, गौण खनिजे, सावकारी परवाना, बाजार व्यवस्थापन, गावाचा विकास व आर्थिक व्यवस्थापन, अंमली पदार्थांचे नियमन, इत्यादी तरतूदी पेसा कायद्यात अंतर्भूत असून ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहेत.

अनुच्छेद 14 मध्ये समानतेचे अधिकार आदिवासींना दिलेले आहेत. आदिवासींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी यामध्ये विशेष तरतूद आहे. यासाठी अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 लागू करण्यात आलेला आहे.

अनुच्छेद 16 (4) अनुसूचित जमातीसाठी शासकीय नोकरीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद आहे. अनुच्छेद 23 मध्ये मानवी व्यापार व जबरदस्ती काम करवून घेणे याविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी विशेष तरतूद आहे. अनुच्छेद 330 मध्ये विधानसभेत व 332 मध्ये लोकसभेत अनु.जमातीच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहूल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करुन हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. राज्यात गडचिरोली, नंदूरबार आणि पालघर हे जिल्हे मुख्यत्वेकरुन आदिवासी बहूल जिल्हे आहेत. या जिल्ह्यात भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींनी जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतीगृहे उपलब्ध करुन दिली जात आहेत. केवळ इतके करुन होत नाही तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करता यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणदेखील आता नव्याने सुरु झाले आहे.

याठिकाणी आदीम जमातींचा अधिवास अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळण-वळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे, यात माडिया -गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी-माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल. याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.

कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते. आदिवासींना ढाल करुन काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येवू नका असे छातीठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करुन इथं आता विकासवाटेवर वाटचाल सुरु झाली आहे, असेच या दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणता येईल.

                 
          
       स्त्रोत ~ WikipediA    
                                                                         ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

वर्ग प्रतिनिधी निवडणूक २०२३\२४

लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी घेतली ई - निवडणूक : 

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्गप्रतिनिधी निवडीसाठी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम :

शालेय विकासासाठी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी संपन्न :
धुळे दि. २८|७|२३



विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता विविध प्रात्यक्षिकांसह शिकविणे ही काळाची गरजच बनलेली आहे. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकवलेले चिरकाल स्मरणात राहते यासाठी आपली लोकशाही व त्यातील निवडणूक प्रक्रिया याची माहीती व्हावी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच विद्यार्थी प्रतिनिधींसाठी लोकशाही पद्धतीने ई - निवडणूक, अनोखी व नाविन्यपूर्ण मतदान प्रक्रिया संपन्न झाली.
या मतदानाचे विशेष म्हणजे ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला. 'वोटींग मशीन' या मोबाईल ॲपच्या सहाय्याने उमेदवार व त्यांचे चिन्ह यासमोरील बटन दाबून विद्यार्थ्यांनी मतदान केले. 
इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गांसाठी वर्ग प्रतिनिधी म्हणून एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरलेले होते. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य श्री प्रवीण पाटील सर यांच्याकडे सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उमेदवार म्हणून उमेदवारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सभा आयोजित करून त्यांना या मतदानासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्ग हा मतदार संघ असून त्या वर्गातील वर्ग प्रतिनिधींसाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक साहित्याचे चिन्ह वाटप करण्यात आले. आणि प्रचारासाठी सुद्धा त्यांना दोन दिवस देण्यात आले. त्यानंतर  इयत्ता पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहीती उपक्रम संयोजक श्री अविनाश पाटील यांनी दिली.

मतदानानंतर कु. किर्ती गवळी (इ. ५ वी), कु. खुशी कोळी (इ. ६ वी), कु. उमेश्वरी पारधी (इ. ७ वी). कु. श्रद्धा चव्हाण (इ. ८ वी), सुमित हिवरकर (इ. ९ वी), भाविका मोहीते (इ. १०), चेतन पाटील (इ. ११ वी) व प्रसाद पाटील (इ. १२ वी) यांनी बहुमत मिळवले. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नाचून जल्लोष साजरा केला. यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यापैकी त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, सहल मंत्री, अर्थ मंत्री, स्वच्छता मंत्री अशी विविध मंत्री पदे देऊन लगेच शपथविधीचा कार्यक्रम ही संपन्न झाला. यातून शालेय कामकाजामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार असून प्रशासकीय कामाची माहीती देखील मिळणार असून त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसीत होईल असा आत्मविश्वास प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते  मनोगतात म्हणाले की, "अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेतला तर नक्कीच त्यांना आपल्या लोकशाही प्रणालीतील बऱ्याचशा गोष्टीं स्पष्ट होतील. शालेय जीवनात समजून घेतलेल्या गोष्टींचा चिरकाल परिणाम होत असतो. म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेमध्ये अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी संधी देत असतो. आज पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिक देण्याची गरज आहे. त्यांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देणे महत्वाचे आहे."

उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री जयेश गाळणकर, श्री कुणाल साळूंके, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांचे सहकार्य लाभले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी अभिनंदन व कौतूक केले.

बहिर्जी नाईक

    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬                संकलन : श्री अविनाश पाटील          बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                    
     स्वराज्याचा तिसरा डोळा
            बहिर्जी नाईक

 
       
             मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगत असलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
           दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.
          बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते.
       शिवाजीच्‍या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणार्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्‍यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असे म्हटले जाते की, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची.
         बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहिती ते ठेवत.
         शिवाजी राजे व संभाजी जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यांत लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले.
       शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाचा बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इथंभूत माहिती महाराजांना दिली होती. बर्‍याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
         सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अश्या रीतीने बहिर्जी नाइकांबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.
          महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धान्त मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धान्त कौटिल्य मांडतो.
        युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्या द्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेर व्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्‍न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.
      बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. *बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.* आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणार्‍यास शिवरायांनी इनाम जाहीर केले, तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.
       स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजलखानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजलखानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदल, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.
        इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा नि:संदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
        पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडे देखील जाते. शाहिस्तेखान प्रसंगातदेखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे (हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐन वेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती). तसेच रमझानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करायची योजना आखली आणि 
ती यशस्वी केली. (राजे सहिष्णू वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी ‘रमझान महिना’ संपण्याची वाट पाहिली नाही).
          शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे २०००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.
       तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले.
          बहिर्जी नाईक भिकार्‍याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटीदरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसांत सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.
      आग्र्‍याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या इंटेलिजन्सची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता.
        शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्या शिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद-बुंदेलखंड-खानदेश-गोंडवन-गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.
         शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगांनी भरलेले आहे. जेथे फक्त पराजय शक्य आहे अशा प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या असून लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली.
        बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखात देखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्यंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाण-घेवाण करणे आणि त्यांत समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनी देखील त्यांचे महत्त्व ओळखून हेरखाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेरखात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेरखात्यास साधनसामग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३००० हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेरखाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंद फितुरीने भरलेला असूनदेखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही.
      इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेर यंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक’.
         गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळात
देखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते हे मान्य करावे लागेल.
         बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आताच्या हेरव्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. ‘रॉ’बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ‘आयएसआय’, ‘सीआयए’शी त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल पण ती उलटय़ा बाजूने करावी लागेल म्हणजे- मोसाद म्हणजे इस्राइलचे बहिर्जी असे म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल.
        जेम्स बाँड असो किंवा शेरलॉक होम्स, ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्रे वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आहे आणि लोक ते पाहण्यास जातात.
        जेम्स बाँड किंवा शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात जी कामिगरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, शिवरायांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्या साहित्यात आणि दृक्श्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा १९४३ सालचा सिनेमा, २-४ छोटेखानी पुस्तके, भूपाळगड (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली आदरांजली.. !
          बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात.
        बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणार्‍या हेन्‍री ओग्झेन्डनचा हा भाऊ). सुरतची लूट चालू असताना वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा. महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणार्‍या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले पण तोपर्यंत उशीर झाला होता, पण त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले.
          २१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिला म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारांपाशी आहे ना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!!
        बाणूरगड महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. येथून पुढे सोलापूर जिल्हा सुरु होतो. मराठी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी येथे आहे.
              ⛰🚩🌋
    🚩 हर हर महादेव 🚩
🙏 स्वराज्य निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात - अज्ञात नरवीर मावळ्यांना विनम्र अभिवादन* 🙏

          ♾♾♾  ♾♾♾
         स्त्रोत ~ Wiipedia                                                                                                                                                                                           ➖➖➖➖➖➖➖➖➖                              

बुधवार, २६ जुलै, २०२३

पालक शिक्षक संघ सभा

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न.
आपल्या पाल्याला ध्येय दाखवा व त्याच्या ध्येय पूर्तीसाठी प्रोत्साहन द्या : नानासाहेब महेंद्र विसपूते 
धुळे दि. २६ 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज पालक शिक्षक संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य श्री पी. बी. पाटील, पालक प्रतिनिधी श्री सुनिल पुंडलिक सोनवणे, श्री छोटू मोहीते उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले. स्वागत श्री ए. के. पाटील, प्रास्ताविक श्री पी. बी. पाटील यांनी तर आभार श्री डी. डी. पवार यांनी मानले. यावेळी उपस्थित पालकांमधून कार्यकारी समितीतील सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष म्हणून श्री सुनिल सोनवणे यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून श्री ए. के. पाटील यांची तर  सहसचिव म्हणून श्री डी. डी. पवार व  श्रीमती सरला गवळी यांची निवड करण्यात आली. पालक सदस्य म्हणून श्री छोटू मोहीते, श्रीमती संगीता पारधी, श्री दिलीप बच्छाव, श्री शंकर मोरे व सुक्राम मोरे यांची निवड करण्यात आली.
उपस्थित पालकांमधून श्री छोटू मोहीते व श्री सुनिल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक केले. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतातून 
पालकांना मार्गदर्शन करतांना नानासाहेब महेंद्रजी विसपूते यांनी सांगीतले की, आपल्या पाल्याला ध्येय ठरविण्यासाठी व ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियमीत प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा द्या. एक दिवस नक्कीच ते आईवडील व गुरूजणांचे नाव लौकिक करतील. संस्थाचालक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सर्व सुविधा पुरवीत असतो. शिक्षक त्यांचे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे करीत असतात. त्यासोबत पालक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहीजे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री कुणाल साळूंखे, श्री जयेश गाळणकर, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार, श्री विलास भामरे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते व सचिव मा. स्मिताताई विसपूते यांनी कार्यक्रम यशस्वी आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...